World Cup Prize Money : पुढील तीन-चार महिने क्रीडा जगतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. येत्या दोन आठवड्यांतच क्रिकेट विश्वात टी-20 विश्वचषकाचा बिगुल वाजणार आहे. यावेळी या स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळणार आहे. टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) सर्व संघांनी कंबर कसली आहे. संघांमध्ये टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरण्यासाठी चढाओढ दिसून येणार आहे. 


T20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर एका आठवड्यातच फुटबॉल विश्वचषक (FIFA World Cup 2022) सुरू होणार आहे. दोन्ही स्पर्धा म्हणजे, क्रिडाप्रेमींसाठी पर्वणीच असणार आहे. दोन्ही स्पर्धांच्या प्राईज मनीची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. दोन्ही स्पर्धा क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. मात्र दोन्ही स्पर्धांच्या प्राईज मनीमध्ये कमालीची तफावत आहे. 


FIFA कडून चॅम्पियन्सला टी-20 पेक्षा अधिक प्राईज मनी 


क्रिकेट आणि फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघांना किती रक्कम मिळते? हे तुम्हाला माहीत आहे का? दोन्ही स्पर्धांमधील विजेत्या संघाला मिळालेल्या बक्षीस रकमेत जवळपास 26 पटींचा फरक आहे. म्हणजेच, T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला जेवढी रक्कम मिळेल, त्याच्या 26 पट अधिक रक्कम फिफा विश्वचषक विजेत्या संघाला FIFA कडून दिली जाणार आहे. 


ICC कडून विश्वचषकाची प्राईज मनी जाहीर 


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच, International Cricket Council नं केलेल्या घोषणेनुसार, टी-20 विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या संघाला एकूण 1.6 मिलियन डॉलर (जवळपास 13 कोटी रुपये) दिले जातील. तर उपविजेत्या संघाला या रकमेच्या निम्मी रक्कम दिली जाणार आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला ICC कडून ठराविक रक्कम दिली जाणार आहे. यासंदर्भातही ICC नं घोषणा केली आहे.  


IPL विजेत्यांपेक्षाही कमी प्राईज मनी 


टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला प्राईज मनी म्हणून केवळ फिफा विश्वचषकच नव्हे, तर इंडियन प्रीमियर लीग (IPL) चॅम्पियन संघाला मिळणाऱ्या रकमेहून कमी रक्कम मिळत आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) विनर संघाला 20 कोटी रुपये मिळाले होते. अशा परिस्थितीत वर्ल्ड कप चॅम्पियनला आयपीएलपेक्षा 7 कोटी रुपये कमी मिळणार आहेत.  


जाणून घ्या, कोणत्या स्पर्धेत विजेत्या संघाला किती प्राईज मनी? 


ICC T20 World Cup 2022 जिंकणाऱ्या संघाला सुमारे 13 कोटी रुपये मिळणार 
FIFA World Cup 2022 जिंकणाऱ्या संघाला सुमारे 342 कोटी रुपये मिळणार 
IPL 2022 चा सीझन जिंकणाऱ्या संघाला सुमारे 20 कोटी रुपये मिळणार 


FIFA विश्वचषक स्पर्धेत दिलं जाणार 3585 कोटींचं प्राईज मनी 


यावेळी फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) कतारमध्ये आयोजित केला जाणार आहे. यासाठी बक्षिसाची रक्कमही जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वितरित करण्यात येणारी बक्षीस 440 मिलियन डॉलर (सुमारे 3585 कोटी रुपये) निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला 42 मिलियन डॉलर (सुमारे 342 कोटी रुपये) मिळतील. गेल्या म्हणजेच, 2018 च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत हे 4 मिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे.