India va Australia, World Cup 2023 Final : बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India va Australia) विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) अंतिम सामना अहमदाबादमध्ये होत आहे. विश्वचषक अंतिम सामन्याआधी विमान कंपन्या आणि हॉटेल्स व्यावसायिकांची चांदी झाली आहे. अहमदाबाद शहराचा विमान प्रवास महागला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार असून हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी देशभरातील क्रिकेट चाहते अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे विमान कंपन्या आणि हॉटेल्स व्यावसायिकांची चांदी झाली आहे.


अहमदाबादचा प्रवास महागला


अहमदाबादला जाणाऱ्या सर्व विमान वाहतूक दरात मोठी वाढ झाली आहे. विमान तिकीट दरांनी उच्चांक गाठला आहे. मुंबई ते अहमदाबाद एका प्रवाशासाठी करावा लागणारा खर्च दुप्पट ते चौपट दराने वाढला आहे. यासोबतच, अहमदाबादेतील हॉटेल्सच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. हॉटेल्सच्या दरात 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी मोठी वाढ झाली आहे. एकंदरीतच विश्वचषक सामन्यांचा फायदा विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्या आणि हॉटेल व्यावसायिकांना झाला आहे. 


विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांचे दर 


18 नोव्हेंबर रोजीसाठी : 



  • मुंबई - अहमदाबाद  : 10 हजार ते 28 हजार रुपयांचा दर (दुप्पट ते चौपट दर)
    ऐरवी मुंबईवरून अहमदाबादला जाण्यासाठी अडीच ते चार हजार मोजावे लागतात. हे दर सध्या 10 हजार ते 28 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत .

  • बंगळुरु - अहमदाबाद : 26 हजार ते 32 हजार रुपयांची दर (चौपट दर) 
    ऐरवी बंगळुरूहून अहमदाबादला जाण्यासाठी पाच ते सात हजार रुपये खर्च येतो. पण, सध्या अंतिम सामन्यामुळे या प्रवासासाठी 26 ते 32 हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

  • हैदराबाद - अहमदाबाद : 17 हजार ते 35 हजार रुपये (तिप्पट दर) 
    ऐरवी हैदराबादवरुन अहमदाबादला जाण्यासाठी पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागतात, त्याजागी आता 17 हजार ते 35 हजार रुपयांचा फटका बसत आहे.

  • दिल्ली - अहमदाबाद : 18 हजार ते 26 हजार रुपये (चौपट दर) 
    ऐरवी दिल्लीवरुन अहमदाबादला जाण्यासाठी साडे चार हजार ते साडे सहा हजार रुपये खर्च येतो, पण आता 18 हजार ते 26 हजार रुपये खर्च होत आहेत.


हॉटेल्सचा दर 18 नोव्हेंबर - 19 नोव्हेंबरसाठी : 



  • प्रीमियम हॉटेल्समधील लक्झरी रुम्सचे दर : 80 हजार ते 1 लाख रुपयांच्या जवळपास 
    सर्वसाधारणपणे प्रीमियमहॉटेल्समधील लक्झरी रुम्सचे दर 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत असतात.

  • बेसिक हॉटेल्स : 35 ते 50 हजार रुपये 
    ऐरवी हा दर 10 - 15 हजार रुपयांपर्यंत असतो.

  • सर्वसाधारण हॉटेल्स : 10 ते 15 हजार रुपये 
    ऐरवी हा दर तीन ते सहा हजार रुपयांपर्यंत असतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


World Cup 2023 : रातोरात मोठा निर्णय घेणार, रोहित शर्मा मेगाफायनलपूर्वी टीम इंडियात बदल करणार?