ICC World Cup 2023,  IND vs AUS Final : अहमदाबादचा मंच. वनडे वर्ल्डकपच्या भैरवीची मैफल इथेच रंगणार आहे. स्वप्नवत लयीत असलेली रोहितसेना भिडणार आहे कमिन्सच्या ऑसी टीमशी. एक लाखांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये आणि करोडो चाहते जगभरात डोळ्यात प्राण आणून हा सामना पाहतील. प्रत्येक भारतीय क्रिकेटरसिकाचं रोमरोम, तन-मन एकच इच्छा करतंय, ध्वज विश्वविजयाचा उंच धरा रे..


विश्वचषकाच्या या दीड महिन्यात या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीमसोबत आपणही हे विश्वविजयाचं स्वप्न जगलोय. त्याचं पहिलं बी या टीमने पेरलं, ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) सलामीच्या लढतीत. तीन बाद 2 अशा केविलवाण्या स्थितीतून ऑसींना त्यांच्याच झुंजार शैलीत उत्तर देत आपण विजयाचा पैलतीर गाठला आणि पुढच्या नऊ सामन्यांमध्ये जे घडलं ते आपल्यासमोर आहे. प्रत्येक सामन्यागणिक परफॉर्मन्सचा अंकुर फुलत गेला, यशाची एकेक फांदी जोडत आता हा वृक्ष चांगलाच डवरलाय. प्रतीक्षा आहे ते विश्वविजेतेपदरुपी फळाची. प्रचंड सुखावणारी गोष्ट म्हणजे यशाच्या प्रत्येक फांदीमध्ये रोहित आणि त्याच्या 10 सहकाऱ्यांच्या घामाचं, कष्टाचं मोल आहे. त्याचं या दहाही सामन्यात सोनं झालंय. 


हार्दिक पंड्याच्या दुखापतीनंतर धाकधूक वाटत होती. पण, त्याच्यासह शार्दूल ठाकूरऐवजी संघात आलेल्या शमी आणि सूर्यकुमार यादवने ही धाकधूक अल्पजीवी ठरवली.आधीच्या चार सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये नसलेल्या शमीने पुढच्या सहा सामन्यात तीनवेळा मॅन ऑफ द मॅच परफॉर्मन्स दिलाय. तो सध्या या स्पर्धेतला सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय. मैदान वानखेडेचं असो किंवा धरमशालाचं. शमी आग ओकतोय. पाटा विकेटमधून तो निखारे पेटवतोय. ज्यात प्रतिस्पर्धी बॅट्समन भाजून निघतायत. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट तितकाच प्रभावी गोलंदाजी करतोय. एक नॉक आऊट पंच देण्यासाठी तोही उत्सुक असेल.
तीच गोष्ट बुमराची. पहिल्याच षटकापासून तो दबावाचा वेढा समोरच्या संघाभोवती टाकतो आणि पुढचे गोलंदाज तो फास आवळतात. असं सातत्याने घडतंय. फिरकी जोडगोळी जडेजा, कुलदीपही लयीत आहेत. सिराजचे एक-दोन स्पेल भन्नाट झालेत. पण, त्याला कांगारुंविरुद्ध कोणतीही ब्रिदिंग स्पेस मिळणार नाही. कारण, कांगारु आक्रमक शैली आणि आक्रमक बाण्यानेच खेळतात. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी अटॅक केला, तर त्याच्या टेम्परामेंटची ती परीक्षा असेल.


ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतले पहिले दोन सामने भारत तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावलेत. पण, हे दोन पराभव त्यांनी मागे सारलेत आणि नंतर मात्र त्यांचा विजयी अश्वमेध चौखूर उधळतोय. अफगाणिस्तानसारख्या नवख्या टीमसमोर त्यांची सात बाद 92 अशी दयनीय स्थिती झालेली असताना मॅक्सवेलच्या झंझावाताने अफगाणी टीमचा पालापाचोळा केला. त्यांनी मिळवलेल्या आठ विजयांपैकी काही सामन्यात ते स्ट्रगल झाले, पण, त्यांनी फिनिशिंग लाईन क्रॉस केली. वनडे वर्ल्डकपमध्ये ते आठव्यांदा फायनल खेळतायत. त्यांना फायनलमध्ये येण्याची आणि ती जिंकण्याचीही सवय आहे. आपल्या तुलनेत त्यांचे सर्व खेळाडू एकाच वेळी क्लिक होत नसतीलही, पण जो क्लिक होतोय, तो विजयाचा टिळा लावूनच ड्रेसिंगरुममध्ये परततोय. कधी तो मॅक्सवेल आहे, कधी कमिन्स तर कधी हेडची धुवाँधार बॅटिंग त्यांचं काम फत्ते करतेय. साखळीत आपण त्यांना पराभूत केलं असलं तरी फायनलमधले कांगारु डबल धोकादायक आहेत. ते आक्रमक क्रिकेट खेळणार हे नक्की. म्हणूनच टॉस जिंकल्यानंतर पहिली फलंदाजी येईल किंवा गोलंदाजी, जे काही मिळेल त्यात पहिल्या एक तासातच आपण त्यांना बॅकफूटवर पाठवायला हवं. नाहीतर कांगारु सामन्यावर एकदा पकड मिळवली की, ती सोडत नाहीत. म्हणूनच त्याच अग्रेशनने आणि कॉन्फिडन्सने आपण उतरणार हे नक्की. पहिली बॅटिंग आली तर, रोहित-शुभमनचा अटॅकिंग गियर आणि पहिली फिल्डिंग आली तर, अर्ली ब्रेक थ्रूज. फिल्डिंगही 200 टक्के प्रयत्न गरजेचे असतील.


माझ्या मते वॉर्नर, हेड, लाबूशेन हीच त्यांची फलंदाजीतली ट्रम्प कार्ड्स आहेत. स्टीव्ह स्मिथ, मार्शवरही लक्ष ठेवावं लागेल. तर, गोलंदाजीत हेझलवूड आणि स्टार्क या अस्त्रांपासून सावध राहावं लागेल. स्टार्कचा लेफ्ट आर्म पेस बॉलरचा टिपिकल अँगल निगोशिएट करताना भारतीय फलंदाजीची काय रणनीती असेल ते पाहायचं. क्रीझबाहेर उभं राहून भारतीय आघाडीवीर हा स्विंग आणि अँगल काऊंटर करतील, असं वाटतंय. त्यातही रोहित शर्माचा पहिल्या 10 ओव्हरमधला प्रेझेन्स मॅचचं भवितव्य ठरवून जाऊ शकतो. किवींसोबतच्या सेमी फायनलमध्येही त्याने पहिल्या 10 ओव्हरमध्येच हू इज द बॉस हे दाखवून दिलेलं. फायनलची मॅच ही प्रेशर कुकर मॅच आहे. मानसिक युद्ध आहे. करोडो फॅन्सच्या अपेक्षा खूप असल्या तरी त्याचं ओझं न घेता या टीमने आतापर्यंत जसा खेळ एन्जॉय केलाय, एकमेकांचा सक्सेस एन्जॉय केलाय, तशा स्टाईलनेच खेळावं. कांगारुंनी 2003 मध्ये आपल्याला फायनलमध्ये निष्प्रभ केलं होतं. आता 20 वर्षांनी पुन्हा ऑस्ट्रेलिया समोर आहे. खिंडीत गाठूया आणि काटा काढूया. चला विश्वविजेतेपद जिंकूया.