Hardik Pandya : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) अखेरचा साखळी सामना भारत आणि झिम्बाब्वे संघात पार पडला. यात टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत भारताला 71 धावांनी विजय मिळवून दिला. दरम्यान याच विजयात हार्दिक पांड्यानंही 18 धावा करत 2 विकेट्सही घेतल्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमध्ये त्याने घेतलेला एक एकहाती झेल तर अगदीच अप्रतिम होता. 7 वी ओव्हर टाकत असताना पांड्यानं तिसऱ्या चेंडूवर झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेगला बाद केलं असून यावेळी गोलंदाजी पांड्याच करत असताना कॅचही त्यानेच घेतली.


हार्दिकच्या या अप्रतिम झेलामुळे झिम्बाब्वेचा अगदी महत्त्वाचा अर्थात कॅप्टन बाद झाल्याने टीम इंडियाला फायदा झाला. विशेष म्हणजे पांड्याने घेतलेल्या या विकेटनंत सर्व संघ खूप आनंदी होता. पण खासकरुन कर्णधार रोहित शर्मा कमालीचा आनंदी होता. तर पांड्याच्या या अप्रतिम झेलचा व्हिडीओ आयसीसीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


पाहा VIDEO






 


भारताची झिम्बाब्वेवर 71 धावांनी मात


सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित आणि राहुल मैदानात आले, पण रोहित 15 धावा करुनच तंबूत परतला. कोहलीही 26 धावा करुन बाद झाला. पण राहुलने आज संयमी फलंदाजी करत 51 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारनं क्रिजवर आल्यापासून फटकेबाजी कायम ठेवली. त्याला पांड्याने 18 धावांची मदत करत एक चांगली भागिदारी उभारली. सामन्यात अवघ्या 25 बॉलमध्ये नाबाद 61 धावा करत सूर्यकुमारने भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली. 187 धावांचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच बॉलवर त्यांचा सलामीवीर वेस्ले भुवीच्य बोलिंगवर कोहलीच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर झिम्बाब्वेचे विकेट्स पडणं कायम होतं. भारताच्या गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा कोणताच फलंदाज टिकू शकत नव्हता. पण त्यांचा स्टार फलंदाज सिकंदर रझा (34) याने मात्र एकहाती झुंज दिली. त्याला आर. बर्ल (35) यानेही चांगली साथ दिली. पण अखेर दोघेही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अवघ्या 115 धावांत झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद झाला आणि भारतानं 71 धावांनी विजय मिळवला. आता भारताची सेमीफायनलमध्ये झुंज इंग्लंडविरुद्ध 10 नोव्हेंबर रोजी असणार आहे.