T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 सामन्यात भारतानं पाकिस्तानचा (India vs Pakistan) चार विकेट्स राखून पराभव केला. या अटीतटीच्या सामन्यात सुरुवातीला पाकिस्तानचं वर्चस्व पाहायला मिळत होतं. परंतु, अखेरच्या काही षटकात विराट कोहली- हार्दिक पाड्यानं (Virat Kohli- Hardik Pandya) सामना भारताच्या बाजून झुकवला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची गरज असताना अनेकदा ट्विस्ट पाहायला मिळालं. पण अखिरेस हा सामना भारतानं जिंकला. मात्र, या सामन्यातील थ्रिलर पाहून आसाम येथील एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. 


बिटू गोगोई (वय, 34) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो आसाम येथील रहिवाशी होता. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिटू हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी त्याच्या मित्रांसह जवळच्या सिनेमागृहात गेला होता. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान तो अचानक बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सामन्यादरम्यान सिनेमा हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात आवाज वाढल्यानं गोगोईला हृयदविकाराचा झटका आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करत पुढील चौकशीला सुरुवात केलीय. 


पाकिस्तानविरुद्ध रोमांचक सामन्यात भारताचा विजय
या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधाराच निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला निर्धारित 20 षटकात 159 धावांवर रोखलं. अर्शदीप सिंह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमारनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 50 धावांच्या आता भारतानं कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलच्या रुपात चार महत्वाचे विकेट्स गमावले. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संयम ठेवत भारताचा डाव पुढं नेला. त्यानंतर अखेरच्या काही षटकात दोघांनीही आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 82 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेली.  दरम्यान, अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना हार्दिक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहलीनं आत्मविश्वास दाखवत भारताला विजय मिळवून दिला. 


हे देखील वाचा-