IND vs PAK, T20 World Cup : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) सामना उद्या अर्थात 23 ऑक्टोबर रोजी रंगणार असून या सामन्यापूर्वीच पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार फलंदाज फखर जमान (Fakhar Zaman) दुखापतीमुळे सामन्याला मुकणार असल्याचं त्यांचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने कळवलं. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेवेळी बाबर प्लेईंग 11 बद्दल बोलत असताना त्याने ही माहिती दिली. सध्या फखर रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात असल्याचंही आझम म्हणाला.


मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान हा सामन रंगणार आहे. याबद्दल बोलताना बाबर म्हणाला,''फखर फिट नसल्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही.” पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मागील महिन्यात दिलेल्या माहितीनुसार फखरला आशिया चषकादरम्यान दुखापत झाली होती, यातूनच तो पूर्णपणे न सावरल्याने सामन्याला मुकणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी दुखापतीमुळे चर्चेत आलेला शान मसूद हा मात्र आता फिट असल्याने तो संघात फखरच्या जागी असणार आहे.


भारतीय संघातही मोठा बदल होण्याची शक्यता


पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकचा संघात समावेश करू शकते. अलीकडे ऋषभ पंतचा फॉर्म खूपच खराब आहे, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामन्यात 9-9 धावांची इनिंग खेळली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही त्याला स्थान मिळालं नाही. या सामन्यात ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आणि कार्तिकने या सामन्यात 10 चेंडूत 20 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतच्या जागी कार्तिकला संधी मिळू शकते.


भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा कार्तिकला संघाचा फिनिशर म्हणून उत्तम पर्याय मानतात. खराब फॉर्ममुळे ऋषभ पंत संघाच्या विश्वासावर टिकू शकला नाही. यामुळे ऋषभला पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं जाऊ शकते. असं झाल्यास पंतच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. त्याचवेळी, कार्तिकच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असेल.


कसे असू शकतात दोन्ही संघ?


भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.


पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.


हे देखील वाचा-