Shaheen Shah Afridi in World Cup : पाकिस्तानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) हा मागील काही काळापासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याचं दिसून आलं. शाहीन आशिया कपमध्येही (Asia Cup 2022) खेळला नव्हता, पण आता आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेसाठी शाहीन सज्ज झाला असून तो कसून सराव करत असल्याचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शेअर केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना आनंद झाल्याचं दिसत आहे. 


विश्वचषकापूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध अधिकृत सराव सामने खेळणार आहे. यासाठी आफ्रिदी उपलब्ध असेल अशी माहितीही समोर आली आहे. दुखापतीशी झुंजणारा आफ्रिदी इंग्लंडहून उपचार घेऊन परतला असून आता तो फिट असल्याचं समोर आलं आहे. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुखापत झालेला आफ्रिदी जवळपास तीन महिने क्रिकेट खेळलेला नाही. विश्वचषकापूर्वी दोन सराव सामने खेळून त्याला गती मिळू शकते. अधिकृत माहिती येण्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आफ्रिदी भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल असे सांगितले होते.


भारतीय फलंदाजांना धडकी


शाहीन आफ्रिदीने खेळलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार करता शाहीनने जवळपास 70% सामन्यांमध्ये पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या आहेत. मागील वर्षी टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याक पहिल्याच षटकात शाहीनने रोहित शर्माची विकेट घेतली होती. यानंतर त्याने केएल राहुल आणि विराट कोहलीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्या सामन्यात टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकात पाकिस्तानकडून भारताचा हा पहिलाच पराभव ठरला होता, त्यामुळे यंदाही शाहीन अशीच भेदक गोलंदाजी करणार? का भारतीय फलंदाज त्याची धुलाई करणार हे पाहावे लागेल. 


विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद आणि उस्मान कादिर.


हे देखील वाचा-