Ishan Kishan and Suryakumar Yadav: वनडे वर्ल्डकप 2023 (ODI World Cup 2023) मध्ये भारतीय क्रिकेट संघानं (Team India) पहिले 4 सामने धडाकेबाज पद्धतीनं जिंकले आहेत. संघाला रविवारी (22 ऑक्टोबर) धर्मशाला (Dharamshala) येथे न्यूझीलंडविरुद्ध (Team India Vs New Zealand) पाचवा सामना खेळायचा आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघाला दुहेरी धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे आधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे. अशातच आता तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादवलाही (Suryakumar Yadav) नेटमध्ये सराव करताना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. तर स्टार फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) मधमाशीनं चावा घेतल्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे.


टीम इंडिया अडचणीत? प्लेइंग-11 निवडण्यात अडचणी येण्याची शक्यता 


स्टार फलंदाज सूर्या भारताचा थ्रो डाउन स्पेशालिस्ट रघुसोबत सराव करत होता. त्यानंतर त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. त्यानंतर सूर्यानं त्यावर पट्टी बांधली आणि हसत हसत मैदानातून बाहेर पडला खरा. पण सूत्रांच्या माहितीनुसार, दुखापतीमुळे सूर्याचं आजच्या सामन्यात खेळणं थोडं अवघडच आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धचा सामना ईशान आणि सूर्यासाठी खेळणं कठीण दिसत आहे. मात्र, याबाबत अद्याप टीम इंडियाच्या निवड समितीकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.


दुखापतीमुळे स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या आधीच न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार आणि ईशानला दुखापत होऊ नये, असं संघ व्यवस्थापनाला वाटत होतं. असं झाल्यास प्लेइंग-11 निवडण्यात अडचणी येऊ शकतात.


प्रशिक्षक राहुल द्रविडनं पांड्याबाबत अपडेट दिलेत 


सामन्याच्या एक दिवस आधी, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत पांड्याबाबत अपडेट दिलं आहे. द्रविड म्हणाला की, "हार्दिक पांड्या आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे, जो प्लेइंग-11 मध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी मदत करतो. आम्ही सर्वोत्तम प्लेईंग-11 निवडण्यावर काम करू. आमच्याकडे फक्त 14 खेळाडू असतील, त्यांच्या भोवतीच संघाची निवड करावी लागेल."


प्रशिक्षक द्रविड म्हणाले, "आमच्या सर्वोत्तम खेळण्यावरही परिणाम होईल. गेल्या 4 सामन्यांमध्ये जशी परिस्थिती होती, तशी ती होणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात गोलंदाजी करताना पांड्याच्या पायाला दुखापत झाली आणि तो जखमी होऊन मैदानाबाहेर गेला."


वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट टीम 


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.


टीम इंडियाचं वर्ल्डकपचं शेड्यूल 


8 ऑक्टोबर vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई (टीम इंडिया 6 विकेट्सनी जिंकली) 
11 ऑक्टोबर vs आफगानिस्तान, दिल्ली (टीम इंडिया 8 विकेट्सनी जिंकली) 
14 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद (टीम इंडिया 7 विकेट्सनी जिंकली) 
19 ऑक्टोबर vs बांगलादेश, पुणे (टीम इंडिया 7 विकेट्सनी जिंकली) 
22 ऑक्टोबर vs न्यूझीलंड, धर्मशाला 
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर vs श्रीलंका, मुंबई 
5 नोव्हेंबर vs साऊथ अफ्रिका, कोलकाता 
12 नोव्हेंबर vs नेदरलँड्स, बंगळुरू