IND vs PAK, WT20 : भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत टी 20 विश्वचषकात विजयी सुरुवात केली. पाकिस्तानने दिलेले 150 धावांचे आव्हान भारतीय संघाने एक षटक आणि सात विकेट्स राखून आरामात पार केले. जेमिमा रॉड्रिग्ज हिने अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावला. ऋचा घोष हिने 31 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून नशरा संधू हिने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानच्या कर्मधाराची 68 धावांची खेळी व्यर्थ ठरली. जेमिमा रॉड्रिग्ज हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पाकिस्तानने दिलेलं 150 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्मा आणि यस्तिका भाटिया यांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. पण 38 धावांवर यस्तिका भाटिया हिच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. यस्तिका हिने 17 धावांची खेळी केली. त्यानंतर जेमिमा आणि शफाली वर्मा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण संधूने शफालीला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. शफाली वर्मा 33 धावांवर बाद झाली. त्यनंतर जेमिमा हिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत भागिदारी करत विजयाकडे आगेकूच केली होती. पण पुन्हा एकदा संधू हिने विकेट घेत भारताला धक्का दिला. हरमनप्रीत कौर 16 धावा काढून तंबूत परतली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या होत्या.. पण जेमिमा आणि ऋचा घोष यांनी संयमी अन् तितकीच आक्रमक फलंदाजी केली. अखेरच्या चार षटकात 41 धावांची गरज होती. त्यावेळी दोघींनी वादळी खेळी केली. दोघांनी अवघ्या तीन षटकात 41 धावांचा पाऊस पाडला. 17 व्या षटकात ऋचा घोष हिने सलग तीन चौकार लगावत पाकिस्तानच्या तोंडूव विजय हिसकवला. जेमिमाने 19 षटकात राहिली सुरली कसर पूर्ण केली. ऋचा घोष आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत 58 धावांची नाबाद भागीदारी केली. जेमिमाने 53 धावांच्या खेळीत 8 चौकार लगावले. तर ऋचा घोष हिने 31 धावांच्या छोटेखानी खेळीत पाच चौकारांचा पाऊस पाडला.
दरम्यान, पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफ हिने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजांनी तो निर्णय चुकीचा ठरवत अवघ्या दहा धावांवर पहिली विकेट घेतली. पण त्यानंतर बिस्मा मारूफ हिने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. बिस्मा मारूफने मोक्याच्या क्षणी संयमी आणि तितकीच आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानची धावसंख्या वाढवली.. बिस्मा मारूफ आणि आयशा नसीम यांच्या अर्धशतकी भागादारीच्या जोरावर पाकिस्तान संघाने 20 षटकांत 149 धावांपर्यंत मजल मारली. बिस्मा मारूफ हिने 55 चेंडूत सात चौकारांसह 68 धावांची खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना बिस्मा हिने दुसरी बाजू लावून धरली. बिस्मा मारूफ आणि आयशा नसीम या दोघींपुढे भारतीय गोलंदाजांनी गुडघे टेकले. दोघींनी 47 चेंडूत नाबाद 81 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर पाकिस्तानचा संघ 149 धावांपर्यंत पोहचला. आयशा नसीम हिने 25 चेंडूत झटपट 43 धावांची खेळी केली. भारताकडून राधा यादव हिने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकर यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला. यांच्याशिवाय इतर गोलंदाजांनाही एकही बळी घेता आला नाही.