IND vs AUS Womens T20 World Cup Semi Final : अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तर पुन्हा एकदा उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ निर्धारित 20 षटकात आठ बाद 167 पर्यंत पोहचू शकला. भारतीय फलंदाजांनी ठरावीक अंतराने आपल्या विकेट फेकल्या. तसेच ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी जबरदस्त फिल्डिंग केली. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. क्षेत्ररक्षण हा दोन्ही संघातील मोठा फरक दिसून आला. भारताने खराब फिल्डिंग केली.. झेल सोडले, धावा वाचवण्यात अपयश आले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने जबरदस्त फिल्डिंग केली.


आघाडीची फळी अपयशी - 
173 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज शेफाली वर्मा अवघ्या नऊ धावा काढून तंबूत परतली. त्यानंतर दोन धावांवर उप कर्णधार स्मृती मंधानानेही आपली विकेट फेकली. यातून भारत सावरतो असे वाटत असतानाच चार धावांवर यात्सिका भाटिया धावबाद झाली. अवघ्या 28 धावांवर भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. 


जेमिमा-हमरनप्रीतने डाव सावरला - 
तीन विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत आणि जेमिमा यांनी भारताचा डाव सावरला. जेमिमाने अवघ्या 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली. तर हरमनप्रीतने कर्णधाराला साजेशी खेळी करताना अर्धशतक झळकावले. हरमनप्रीतने 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. हरमनप्रीतने आपल्या खेळीदरम्यान एक षटकार आणि सहा चौकार लगावले. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 41 चेंडूत 69 धावांची भागिदारी केली. ऋचा घोषला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. ऋचा घोष 14 धावा काढून तंबूत परतली. भारत सामना जिंकेल असे वाटत असतानाच हरमनप्रीत आणि ऋचा एकापाठोपाठ एक बाद झाल्या, त्यामुळे सामन्यात ऑस्ट्रेलिायने पुनरागमन केले. 


ऑस्ट्रेलियाची 172 धावांपर्यंत मजल


बेथ मूनीचं दमदार अर्धशतक आणि कर्णधार मेग लॅनिंग हिची विस्फोटक खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 172 धावांपर्यंत मजल मारली. निर्णायाक सामन्यात भारताच्या एकाही गोलंदाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही, त्याशिवाय फिल्डर्सनेही नांगी टाकली. एलिसा हिली आणि बेथ मूनी या दोघींनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघींनी अवघ्या 45 चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर बेथ मूनी हिने कर्णधाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढवली. बेथ मूनी आणि मेग लॅनिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी 27 चेंडूत 36 धावांची भागिदारी केली. बेथ मूनी हिने अर्थशतक झळकावले, त्यानंतर ती बाद झाली. पण त्यानंतर मेग लॅनिंग आणि एशलेग गार्डनर यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघींनीही चौकार आणि षटकार लगावत धावांचा पाऊस पाडला. दोघांनी प्रत्येक षटकात एक तरी चौकार लगावत भारतीय गोलंदाजांची पिटाई केली. दोघींनी अवघ्या 32 चेंडूत अर्थशतकी भागिदारी केली.  फक्त 18 चेंडूत 31 धावा करुन एशलेग गार्डनर बाद झाली. दिप्ती शर्माने एशलेगला बाद केले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिने धावांचा पाऊस पाडला. मेग लॅनिंग हिने निर्णायाक खेळी केली. 


भारताची खराब गोलंदाजी -


उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. स्नेह राणा, राधा यादव, शिखा पांडे, रेनुका सिंह आणि दिप्ती शर्मा एकाही गोलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. एकाही गोलंदाला धावा रोखण्यात यश आले नाही. शिखा पांडेनं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर राधझा यादव आणि दिप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रेणुका सिंह सर्वात महागाडी गोलंदाज ठरली. रेणुकाने चार षटकात दहा पेक्षा जास्त सरासरीने धावा लुटल्या.  


भारताचे खराब क्षेत्ररक्षण  - 


एका बाजूने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज धावांचा पाऊस पाडत होते, दुसऱ्या बाजूला भारतीय फिल्डर्सनी खराब फिल्डिंग केली. ऋचा घोष आणि शेफाली वर्मा यांनी झेल सोडले. याचा फटका टीम इंडियाला बसला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिला सुरुवातीलाच जिवनदान दिले. त्याशिवाय बेथ मूनीचाही झेल सोडला. या दोन्ही फलंदाजांनी नंतर धावांचा पाऊस पडला. झेल सोडलेच त्याशिवाय काही फिल्डर्सने एकेरी दुहेरी धावसंख्याही दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला.