Women's T20 World Cup Semi Final : ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग हिने निर्णायक सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. नाणेफेक जिंकून मेग लेनिंग हिने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला टी20 वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर आतापर्यंत वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही, भारतीय संघात एक बदल आहे. स्नेह राणा हिला संधी देण्यात आली आहे. आजारी असल्यामुळे पूजा सामन्याला मुकणार आहे.

भारतीय टीम दोन बदलासह मैदानात उतरली आहे. पूजा वस्त्राकरच्या जागी स्नेह राणाला स्थान दिलेय तर राजेश्वरी गायकवाडच्या जागी राधा यादवला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली आहे.   

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्लेइंग इलेवन कशी असेल

भारत महिला (प्लेइंग इलेवन): शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव, रेणुका ठाकुर सिंह 

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेवन) : एलिसा हिली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), एशलेग गार्डनर, एलिसे पेरी, ताहलिया मॅकग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेयरहम, जेस जोनासेन, मेगन शुट्ट, डार्सी ब्राउन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अंतिम फेरीत पोहचण्यासाठी लढत होणार आहे.  पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता त्यांच्यापुढे ऑस्ट्रेलियाचं तगडे आव्हान असेल. सेमीफायनलचा सामना जिंकणं तसं पाहायला गेलं तर भारतीय संघासाठी फारसं सोपं नसणार आहे. कारण भारतीय महिला संघाचा कांगारू संघाविरुद्ध टी-20मधील रेकॉर्ड फारसा चांगला नाही. जर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेले शेवटचे पाच सामने पाहिले तर त्यातही भारतीय संघ मागे पडल्याचं दिसतंय. 

हेड-टु-हेड 

एकूण टी-20 रेकॉर्ड पाहिल्यास भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खूपच कमकुवत दिसत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने केवळ 6 सामने जिंकले आहेत. तर 22 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, एक सामना बरोबरीत राहिला, तर एक सामना अनिर्णीत राहिलाय.