Women’s T20 World Cup 2023 Semifinal : टी 20 विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्याला काही तास शिल्लक असतानाच भारतासाठी एक चिंताजनक बातमी आली आहे. भारताची आघाडीची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर आजारी आहे. त्यामुळे ती उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. पूजा वस्त्राकर हिच्या जागी प्लेईंग 11 मध्ये स्नेह राणा हिला संधी देण्यात येणार असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केलेय. सुत्रांच्या माहितीनुसार, कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या खेळण्यावरही सस्पेन्स आहे. हरमनप्रीत कौरही आजारी आहे, त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार असल्याचे काही प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे. हा भारतासाठी मोठा धक्का असू शकतो.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यापूर्वीच पूजा वस्त्राकर हिला व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे ती उपांत्य सामन्याला मुकणार आहे. पूजाच्या जागी स्नेह राणा हिला संघात स्थान देण्यात आले आहे.
बीसीसीआयचे ट्वीट -
इंडियन एक्प्रेसच्या एका रिपोर्ट्सनुसार, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर ही सुद्धा आजारी आहे. तिलाही व्हायरल झाले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत खेळण्याची शक्यता नाही. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत स्मृती मंधाना कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात आघाडीचे दोन खेळाडू नसल्यामुळे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांची कमी भारतीय टीमला जाणवणार, यात कोणताही शंका नाही.
हेड टू हेड -
हरमनप्रीतच्या टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं तगडे आव्हान असेल. याआधीचा रेकॉर्ड पाहिल्यास ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पारडे जड दिसतेय. दोन्ही संघ आतापर्यंत टी 20 मध्ये 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियानं तब्बल 22 वेळा विजय मिळवला आहे. तर भारताला सात सामन्यात विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता.
कोण मारु शकतो बाजी ?
टी 20 मध्ये जेव्हा जेव्हा भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यात सामना रंगलाय, तेव्हा तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ झाल्याचं समोर आलेय. हा सामना त्रयस्त ठिकाणी असला तरीही येथील खेळपट्टी ऑस्ट्रेलियाला पोषक आहे. पण भारतीय संघ उलटफेर करण्यास माहिर आहे. अशातच हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडे जड मानले जातेय. पण भारतीय संघही विजयाचा दावेदार आहे.
आणखी वाचा :
फायनलमध्ये कोण जाणार? भारत-ऑस्ट्रेलियात अटीतटीची लढत, पाहा A टू Z माहिती