T20 World Cup 2022 : इंग्लंड क्रिकेट टीमने (Englant Cricket Team) टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला मात देत वर्ल्ड कप जिंकला आहे. या फायनच्या सामन्यात इंग्लंडचा स्टार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने नाबाद 52 धावांची सुपर खेळी खेळली, ज्यानंतर संघाचा कर्णधार जोस बटलरने स्टोक्सचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच स्टोक्स इंग्लंडचा सर्वात महान क्रिकेटर आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना नक्कीच तो लवकरच इंग्लंड क्रिकेटमधील महान क्रिकेटर होईल, अशी प्रतिक्रिया बटलरने दिली. 


नुकताच इंग्लंड संघाने टी20 विश्वचषक 2022 जिंकला आणि इतिहास रचला, कारण दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडीजच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी केली आहे. तसंच 2019 चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2022 चा टी20 विश्वचषक असे दोन्ही विश्वचषक एकावेळी एकाच संघाकडे असण्याचा मानही इंग्लंडला मिळाला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही विश्वचषक जिंकवून देताना अंतिम सामन्यात सिंहाचा वाटा उचलला तो इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने. स्टोक्सने पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 49 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली, ज्यामुळे इंग्लंडला विजय मिळवता आला. याशिवायही अनेक सामन्यांमध्ये आतापर्यंत स्टोक्सने आपली कमाल दाखवली आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात मानाची मालिका असणाऱ्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेज सिरीजमध्येही स्टोक्सने कमाल केली आहे. 2019 च्या अॅशेजमधील तिसऱ्या कसोटीत स्टोक्सने दुसऱ्या डावात इंग्लंडकडून एकहाती झुंज देत अगदी 9 विकेट पडल्या असतानाही सामना जिंकवून दिला होता. त्याच्या अशा कित्येक कमाल खेळींमुळे त्याला आता इंग्लंडचा एक आघाडीचा स्टार क्रिकेटर म्हटलं जातं. ज्यामुळेच बटलर याने देखील त्याचं कौतुक केलं आहे.


काय म्हणाला जोस बटलर?


''बेन स्टोक्स निश्चितपणे इंग्लंडचा महान क्रिकेटपटू होण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा जेव्हा यावर चर्चा होईल तेव्हा निश्चितपणे त्यांचे नाव देखील समोर येईल. संघाच्या मोठ्या विजयांमध्ये स्टोक्स संघासोबत उभा असतो. तो असा खेळाडू आहे जो स्वतःवर सर्व जबाबदारी घेऊन कामगिरी करतो. जेव्हा तो क्रीजवर असतो तेव्हा संघाला जिंकण्याची सुवर्णसंधी असते. मला स्टोक्सचा खूप अभिमान आहे. त्याने चिकाटी दाखवून पुन्हा एकदा संघाला यश मिळवून दिल्याचा मला आनंद आहे.''


हे देखील वाचा-