अमित पंघालची ऐतिहासिक कामगिरी, जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
एबीपी माझा वेब टीम | 20 Sep 2019 11:40 PM (IST)
भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघालनं पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात भारतीय बॉक्सरनं या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

एकाटेरिनबर्ग (रशिया) : भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघालनं पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात भारतीय बॉक्सरनं या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. रशियातल्या एकाटेरिनबर्गमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत एशियाड आणि आशियाई सुवर्णविजेत्या अमित पंघालसमोर 52 किलो वजनी गटाच्या उपांत्यफेरीत कझाकस्तानच्या साकेन बिबोसिनोव्हचं कडवं आव्हान होतं. अमितनं हे आव्हान 3-2 असं मोडीत काढून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात अमितचा सामना उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिकविजेत्या शाखोबिदीन झोईरोव्हशी होणार आहे. दरम्यान जागतिक बॉक्सिंगच्या पुरुष गटात भारताला एकदाही सुवर्ण किंवा रौप्यपदक पटकावता आलेलं नाही. याआधी भारताच्या चार बॉक्सर्सना कांस्यपदकावरच समाधान मानावं लागलं होतं. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यविजेते बॉक्सर2009 - विजेंदर सिंग2011 - विकास कृष्णन2015 - शिवा थापा2017 - गौरव भिदुरी एकूणच शनिवारच्या अंतिम लढतीत अमित पंघाल बॉक्सिंगच्या इतिहासात नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो विक्रमावर अमितचा सोनेरी पंच असेल की रुपेरी हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.