नूर सुलतान (कझाकस्तान) : भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. बजरंगनं 65 किलो गटात कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या तुलगा तुमूर ओशीरवर 8-7 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला. कझाकस्तानच्या नूर सुलतानमध्ये जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.


65 किलो गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत बजरंग सुरुवातीला 0-6 अशा फरकानं पिछाडीवर होता. पण अखेरच्या काही मिनिटांत बजरंगनं खरी कमाल करत 8-7 असा विजय साजरा करत कांस्यपदक पटकावलं.

जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंगचं तिसरं पदक

जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेतलं बजरंगचं हे आजवरचं तिसरं पदक ठरलं आहे. त्यामुळे जागतिक कुस्तीची तीन पदकं मिळवणारा तो भारताचा पहिलाच पैलवान ठरला आहे. याआधी 2013 आणि 2018 साली बजरंगनं या स्पर्धेत पदक मिळवलं होतं.

जागतिक कुस्तीत बजरंगची कामगिरी

कांस्यपदक - 2013 (बुडापेस्ट, हंगेरी)
रौप्यपदक - 2018 (बुडापेस्ट, हंगेरी)
कांस्यपदक - 2019 (नूर सुलतान, कझाकस्तान)

ऑलिम्पिकचं तिकीट कन्फर्म

जागतिक कुस्ती स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर बजरंग पुनिया 2020 सालच्या टोकियो ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.