मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने कर्णधार विराट कोहलीच्या विनंतीला मान्यता दिली आहे. परदेश दौऱ्यावर खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेण्डना (वॅग्ज) सोबत घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती विराट कोहलीने केली होती. बोर्डात नियुक्त असलेल्या प्रशासकीय समितीने विराटची ही मागणी मान्य केली. मात्र यासाठी एक अट घालण्यात आली आहे. ती म्हणजे दौरा सुरु झाल्यावर दहा दिवसांनंतरच पत्नी किंवा गर्लफ्रेण्डने तिथे दाखल व्हावं.

परदेश दौऱ्यात पत्नी किंवा गर्लफ्रेण्डना सोबत नेण्याच्या सध्याच्या नियमात बदल करण्याची मागणी विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडे केली होती. याआधी बीसीसीआयचं 'नो वाईव्ह्ज-गर्लफ्रेण्ड' धोरण होतं. मात्र नंतर या धोरणात बदल करुन नवा नियम लागू केला होता. या नियमानुसार, क्रिकेटर, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफच्या पत्नी किंवी गर्लफ्रेण्ड दोन आठवड्यांसाठी परदेश दौऱ्यावर जाऊ शकतात.

आता कर्णधार विराट कोहलीच्या या मागणीवर विचार केल्यानंतर प्रशसकीय समिती या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे की, परदेश दौऱ्यावर पत्नी किंवा गर्लफ्रेण्ड असल्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. पण त्या दौरा सुरु झाल्यानंतर दहा दिवसानंतरच तिथे जाऊ शकतात.

प्रशासकीय समितीने विराट कोहलीच्या मागणीवर सखोल विचार केला. परदेश दौऱ्यावर असताना खेळाडू बराच काळ घराबाहेर असतात. अशावेळी त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेण्ड सोबत असल्या तर खेळाडूंसाठी सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं. या निर्णयापूर्वी समितीने कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्यासोबत मागील आठवड्यात वेस्ट इंडीजविरुद्धच्या हैदराबादमधील दुसऱ्या कसोटीआधी बैठक घेतली होती.

2015 मध्ये जेम्स सदरलॅण्ड हे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे सीईओ असताना त्यांनी वाईव्ह्ज-गर्लफ्रेण्ड सोबत असाव्यात असं धोरण अवलंबलं होतं. यामुळे अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी चांगली होती.