मुंबई: मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरर्सवर अन्न आणि औषध विभागाकडून काल रात्री धाडी टाकण्यात आल्या. दुधातील भेसळ रोखण्यासाठी दूध तपासणी करण्यात आली. वाशी, ठाणे, कल्याण अशा मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणी मोहीम सुरु केली. दुधातील घटक हे नियमानुसार आहेत का याची तपासणी केली जात आहेत. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अचानकपणे ही तपासणी करत आहेत.
काल रात्री मुंबईच्या विविध 5 प्रवेशद्वारांवर या धाडी टाकण्यात आल्या. वाशी, मुलुंड कल्याण, ठाणे, ऐरोली आणि दहीसर टोल नाक्यांवर दूध टँकर रोखून, दुधाचे नमुने घेण्यात आले. दुधात भेसळ आहे की नाही हे तपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या काळात दूध आणि मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं यापूर्वी अनेकवेळा समोर आलं आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने यंद कडक पावलं उचलली आहेत.
दरम्यान, ज्या टँकर्समधून दुधाचे नमुने घेण्यात आले, त्यामध्ये कोणतीही भेसळ नसल्याचं समोर आलं आहे.
भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा
राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांना शिक्षा करणारा कायदा लवकरच करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केली. दूध भेसळ प्रकरणातील दोषींना तीन वर्षांचा कारावास होणार आहे. दूध भेसळीबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गिरीश बापट यांनी ही घोषणा केली होती. सध्या दूध भेसळखोरांना सहा महिन्यांची शिक्षा आहे. मात्र सहा महिन्यांची शिक्षा असल्यामुळे या प्रकरणात लगेच जामीन होतो. ही शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवली तर आरोपीला जामीन होणार नाही. त्यामुळे तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणारा कायदा लवकरच केला जाईल, असं बापट यांनी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं होतं.
मुंबईच्या प्रवेशद्वारांवर दूध टँकरवर FDA च्या धाडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Oct 2018 08:12 AM (IST)
सणासुदीच्या काळात दूध आणि मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं यापूर्वी अनेकवेळा समोर आलं आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने यंद कडक पावलं उचलली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -