केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरची विकेट पडली आणि ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कसोटी कर्णधार... टिम पेन.


या टिम पेननं ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन केलं ते 2017 सालच्या अॅशेस मालिकेच्या निमित्तानं. त्याआधी तो अखेरचा कसोटी सामना खेळला होता तो 2010 साली. त्यानंतर अवघ्या बारा कसोटी सामन्यांमध्ये टिम पेन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण म्हणतात ना, क्रिकेट इज ए गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी... त्याची प्रचीती पुन्हा आली. तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियानं टिम पेनची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती केली यामागे काही ठोस कारणं आहेत.

पहिलं कारण : टिम पेन हा ऑस्ट्रेलियाचा सध्याचा इन फॉर्म फलंदाज आहे.

टिम पेननं पुनरागमनानंतर आठ कसोटी सामन्यांमध्ये 338 धावा फटकावल्या आहेत. यष्टिरक्षणाचाही मोठा अनुभव त्याच्या गाठीशी आहे.

दुसरं कारण : टिम पेनमधले नेतृत्त्वाची नैसर्गिक गुणवत्ता

ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या पहिल्या कसोटीत डेव्हिड वॉर्नर आणि क्विन्टन डी कॉक यांच्यात झालेला वाद.

त्या दोघांमधला वाद चिघळायच्या क्षणी टिम पेननं त्यात यशस्वी हस्तक्षेप केला होता. वॉर्नर आणि डी कॉकमधली शाब्दिक चकमक टिपेला पोहोचली होती. त्यावेळी टिम पेननंच वॉर्नरला ड्रेसिंगरूममध्ये नेलं होतं.

तिसरं कारण : स्टीव्ह वॉची पारखी नजर

ऑस्ट्रेलियाचा एक महान कर्णधार म्हणून ओळखला जाणाऱ्या स्टीव्ह वॉनं टिम पेनमधले नेतृत्त्वगुण आधीच हेरले होते. रिकी पॉन्टिंग आणि मायकल क्लार्क यांच्यानंतर टिम पेन हा ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचा पर्याय ठरु शकतो असं भाकित स्टीव्ह वॉनं केलं होतं.

स्टीव्ह वॉचं ते भाकित अखेर खरं झालं आहे. टिम पेन हा ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार बनला आहे.

टिम पेनची कारकीर्द

टिम पेननं ऑगस्ट 2009 मध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या वन डेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2010 साली पाकिस्तानविरुद्धच्या लॉर्डस कसोटीत पेन पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाची ग्रीन बॅगी कॅप घालून मैदानात उतरला.  स्टीव्ह स्मिथनेही 2010 मध्येच कसोटी पदार्पण केलं होतं.

पेननं आजवरच्या कारकीर्दीत 12 कसोटी सामन्यांमध्ये 41.66 च्या सरासरीनं 625 धावा फटकावल्या आहेत. त्यानं 30 वन डेत सामन्यांमध्ये 31.62 च्या सरासरीन 854 धावा जमवल्या आहेत. त्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.



ऑक्टोबर 2010 मध्ये भारत दौऱ्यातल्या बंगळुरु कसोटीनंतर टिम पेनला बोटाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर ब्रॅड हॅडिन आणि मॅथ्यू वेड या प्रमुख यष्टीरक्षकांमुळं पेनला संघात पुन्हा स्थान मिळवणं अशक्य झालं. त्यामुळं निराश झालेल्या टिम पेननं क्रिकेटला गुडबाय करून,चक्क नोकरी करण्याचा विचार केला होता. पण अखेर टिम पेनच्या संघर्षाला यश आलं.

2017 साली इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेच्या निमित्तानं मॅथ्यू वेडऐवजी टिम पेनचं तब्बल सात वर्षानंतर पुनरागमन झालं. आणि तिथून टिम पेनचं नशिबच इतकं खुललं की, आज तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधार बनला आहे.

ऑस्ट्रेलियानं गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:चा एक दबदबा निर्माण केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समधला एक बलाढ्य संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं जातं. पण बॉल टॅम्परिंग प्रकरणानं त्याच ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे. ऑस्ट्रेलियाची ही डागाळलेली प्रतिमा बदलण्याची जबाबदारी आता टिम पेनच्या खांद्यावर आहे.

संबंधित बातम्या

वॉर्नर कधीही कर्णधार होणार नाही, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय

स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच : सचिन तेंडुलकर

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी

समालोचकाच्या चाणाक्ष नजरेमुळे बॉल टॅम्परिंगची घटना उघड!

VIDEO : स्टीव्ह स्मिथवर आजीवन बंदी घाला : संदीप पाटील

व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास

चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद

तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल

स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!

'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं

क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना

स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई