चंद्रपूर : एकीकडे विजय मल्ल्या आणि नीरव मोदी सारखे महाशय देशाला हजारो कोटींचा चुना लावून पसार होत असताना दुसरीकडे फक्त 4 रुपयांसाठी चंद्रपूर महापालिकेकडून एका सामान्य नागरिकाला मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

केवळ 4 रुपयांच्या मालमत्ता करासाठी चंद्रपूर महापालिका एका नागरिकाला सतत मेसेज पाठवून त्याची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देत आहे.

चंद्रपूरातल्या उत्तम बनसोडे यांनी जुलै महिन्यात 502 रुपये ही आपल्या घराच्या कराची रक्कम भरली. त्यावेळी त्यांनी मनपाकडून 4 रुपयांची सूट देण्यात आली. मात्र त्याच 4 रुपयांसाठी आता सतत मेसेज करुन मनपाने बनसोडे यांना मनस्ताप द्यायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे ही चूक होत असल्याचं स्पष्टीकरण महापालिकेने दिलं आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेनं ठरवून दिलेल्या मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची मुदत दिलेली आहे. चंद्रपुरातील उत्तम बन्सोडे यांनीही आपल्या घराच्या करापोटी ५०२ रुपये मागील जुलै महिन्यातच भरले. मात्र, त्यांना गेल्या आठ दिवसांपासून महापालिकेकडून सतत कर भरण्याचा मेसेज मोबाईलवर येत आहे.

या मेसेजमधील कराची रक्कम बघितली तर कुणालाही आश्चर्य वाटेल. केवळ चार रुपयांसाठी हा मेसेज पाठवला जात आहे. कराचा पूर्ण भरणा केल्यानंतरही सतत हा मेसेज पाठवून मालमत्ता जप्तीचा इशारा दिला जात असल्यानं बन्सोडे दाम्पत्य चांगलंच धास्तावलं आहे.