एक्स्प्लोर
एकेकाळची फुटबॉलची महासत्ता उरुग्वेला घरचा रस्ता कशामुळे?
फ्रान्सच्या या विजयाने उरुग्वेचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच राहिलं. खरं तर एका जमान्यात उरुग्वे हा देशही फुटबॉलची महासत्ता होता. पण त्याच उरुग्वेला 1950 सालानंतर विश्वचषक जिंकता आलेला नाही.

मुंबई : फ्रान्सने उरुग्वेचा 2-0 असा पराभव करून, फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फ्रान्सच्या या विजयाने उरुग्वेचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच राहिलं. खरं तर एका जमान्यात उरुग्वे हा देशही फुटबॉलची महासत्ता होता. पण त्याच उरुग्वेला 1950 सालानंतर विश्वचषक जिंकता आलेला नाही. रशियातल्या विश्वचषकात खरं तर उरुग्वेचा बचाव हा पोलादी मानण्यात येत होता. पहिल्या चार सामन्यांमध्ये चार प्रतिस्पर्ध्यांना मिळून उरुग्वेवर केवळ एकच गोल डागता आला होता. गोलरक्षक मुसलेरा, तसंच बचावफळीतल्या दियागो गॉडिन आणि जोस गिमिनेझ यांचं संरक्षण भलतंच पोलादी ठरत होतं. पण फ्रान्सच्या अॅन्टॉईन ग्रिझमनने निव्वळ तासाभरात उरुग्वेचा बचाव एकदा नाही, तर दोनदा भेदला. त्यात उरुग्वेचा दुखापतग्रस्त आक्रमक एडिन्सन कॅवानीची अनुपस्थिती फ्रान्सच्या पथ्यावर पडली. आणि उरुग्वेला उपांत्यपूर्व फेरीतूनच गाशा गुंडाळायला भाग पडलं. रशियातला फिफा विश्वचषक ही उरुग्वेसाठी फुटबॉलविश्वावर ठसा उमटवण्याची एक नामी संधी होती. पण फ्रान्सविरुद्धच्या पराभवामुळे उरुग्वेने ती संधी वाया दवडली. उरुग्वेचं दुर्दैव म्हणजे आजवर या देशाला फुटबॉलच्या जगात वेगळी ओळख मिळवता आलेली नाही. शेजारचा अर्जेंटिना आणि उरुग्वेची राष्ट्रभाषा एकच स्पॅनिश. त्यात त्या दोन्ही देशांमधले शब्दांचे उच्चार आणि त्यांची संस्कृती यात कमालीचं साम्य आहे. त्यामुळे उरुग्वेच्या नागरिकांना जगभरात अर्जेंटिनी म्हणूनच ओळखलं जातं. पण एका जमान्यात फुटबॉलच्या नकाशावर उरुग्वेला वेगळं अस्तित्व होतं. उरुग्वेने 1924 आणि 1928 साली ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तसेच आजवरच्या इतिहासात उरुग्वेने एकदा नव्हे, तर दोनवेळा फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्यांदा 1930 आणि मग 1950 साली. 1930 साली उरुग्वेने मायदेशात अर्जेंटिनाचा 4-2 असा पराभव करून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. 1950 साली उरुग्वेने ब्राझिलला 2-1 असं हरवून विश्वचषक जिंकला होता. उरुग्वेने 1924 ते 1930 या कालावधीत फुटबॉलविश्वावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं याचं कारण होतं तिथलं सर्वसमावेशक सामाजिक धोरण. दक्षिण अमेरिकेतल्या बहुतेक देशांमध्ये फुटबॉल स्थलांतरित युरोपियन्सपुरता मर्यादित राहिला होता. तिथे उरुग्वेने तळागाळाच्या समाजाला फुटबॉलमध्ये सामावून घेतलं. जोस आंद्रादे हा एका आफ्रिकी गुलामाचा लेक त्या काळात उरुग्वेच्या फुटबॉलचा नायक होता. जोस आंद्रादे आणि त्या काळातल्या शिलेदारांनी उरुग्वेला 1924 ते 1930 या कालावधीत उरुग्वेला दोनदा ऑलिम्पिक आणि एकदा विश्वचषक जिंकून दिला. त्याशिवाय उरुग्वेने आजवर तब्बल पंधरावेळा कोपा अमेरिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. फुटबॉलच्या दुनियेत एवढा मोठा पराक्रम गाजवूनही उरुग्वेला या खेळात आपला दबदबा निर्माण करता आलेला नाही. याचं पहिलं कारण उरुग्वेने गेल्या 68 वर्षांत विश्वचषक जिंकलेला नाही. उरुग्वेने 1970 सालानंतर तब्बल 40 वर्षांनी म्हणजे 2010 साली विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. मग 2014 साली उरुग्वेने विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. उरुग्वेने यंदा एक पाऊल पुढे टाकलं, पण त्यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. उरुग्वेची ही कामगिरी दिसायला लक्षवेधक आहे, पण लक्षवेधक कामगिरी करणं आणि विश्वचषक जिंकणं यात फरक आहे, याची उरुग्वेला आता कल्पना आली असावी.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























