राजकोट :  युवा खेळाडू पृथ्वी शॉला भक्कम साथ देणारा चेतेश्वर पुजारा माघारी परतला आहे.  डोरीच लेविसने पुजाराला 86 धावांवर विकेटकीपरकरवी झेलबाद केलं. पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, मुंबईच्या पृथ्वी शॉनं राजकोट कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खणखणीत शतकी पदार्पण केलं. अवघ्या 18 वर्षाच्या पृथ्वीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या आणि पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावलं. विंडीज गोलंदाजांनी पृथ्वी शॉच्या फलंदाजीसमोर अक्षरश: प्रदक्षिणा घातली. फिरकी असो की वेगवान गोलंदाज पृथ्वी शॉने विंडीज गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवत शतक झळकावलं.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा पंधरावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं 99 चेंडूंत 15 चौकारांच्या सहाय्यानं आपलं शतक साजरं केलं.

उपाहारपर्यंतचा खेळ

मुंबईच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीत आपल्या लौकिकाला साजेसं पदार्पण केलं आहे. त्याने अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या दिवशी उपाहाराला एक बाद 133 धावांची मजल मारता आली. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी पृथ्वी 75 धावांवर खेळत होता. त्याच्या या खेळीला अकरा चौकारांचा साज आहे. कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो आजवरचा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला. तर पुजाराने 74 चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या राजकोट कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या कसोटीत संपूर्ण भारताचं लक्ष 18 वर्षीय पृथ्वी शॉच्या पदार्पणाकडे लागलं होतं. पृथ्वी शॉ आणि के एल राहुल भारताकडून सलामीला उतरले. महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीने तीन फिरकीपटू आणि दोन मध्यमगती गोलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. यामध्ये रवींद्र जाडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव या फिरकीपटूंचा तर उमेश यादव आणि मोहम्मद शमी या मध्यमगती गोलंदाजांचा समावेश आहे. तिसरा फिरकीपटूच खेळवल्याने शार्दूल ठाकूरला बाहेर बसावं लागलं. अंतिम 11 जणांमध्ये 5 फलंदाज, 5 गोलंदाज आणि 1 विकेटकीपर ऋषभ पंत यांचा समावेश आहे.

सलामीला पृथ्वी शॉ आणि के एल राहुल, मग कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव असा फलंदाजी क्रम असेल.

विराट कोहलीची टीम इंडिया आणि जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिज संघादरम्यानच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजकोटमध्ये खेळवण्यात येत आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिज आठव्या क्रमांकावर. आयसीसी क्रमवारीतली ही तफावत आणि घरच्या मैदानावर खेळण्याची संधी यामुळे टीम इंडियाचं पारडं या कसोटीत जड असल्याचं दिसून येतं आहे.



सलामीला राहुलच्या साथीला पृश्वी शॉ
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या अंतिम बारा खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. या संघात मुंबईच्या पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे.  सलामीवीर शिखर धवनऐवजी पृथ्वी शॉ लोकेश राहुलच्या साथीनं भारतीय डावाची सुरुवात करेल. पृथ्वी शॉने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 14 सामन्यात 56.72 च्या जबरदस्त सरासरीने 1418 धावांचा रतीब घातला आहे. त्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी ही ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी टीम इंडियाला अखेरची संधी आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनाने विंडीजविरुद्धच्या मालिकेत नवे पर्याय तपासून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईच्या पृथ्वी शॉसह हनुमा विहारी, रिषभ पंत, मयांक अगरवाल आणि मोहम्मद सिराज हे भारतीय ड्रेसिंगरुममध्ये दाखल झालेले नवे पाहुणे या मालिकेत खेळताना दिसतील.

12 सदस्यांमध्ये मयांकचा समावेश नाही
इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनऐवजी पृथ्वी शॉला सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते. इंग्लंड दौऱ्यातल्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान पृथ्वीला भारतीय ड्रेसिंगरुम शेअर करण्याची संधी मिळाली होती. राजकोट कसोटीआधी जाहीर झालेल्या 12 सदस्यीस संघात पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला. मात्र मयांक अगरवाल या 12 सदस्यांमध्ये जागा मिळवू शकला नाही. कर्नाटकच्या मयांक अगरवालने गेल्या रणजी मोसमात धावांचा अक्षरश: रतीब घातला होता. त्याने आठ सामन्यांत 1160 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळं निवड समितीनं विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी मयांकचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

हनुमा विहारी आणि रिषभ पंत यांनी इंग्लंड दौऱ्यातल्या पाचव्या कसोटीत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्षवेधक कामगिरी बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारताची नवी आशा ठरु शकतो.

टीम इंडियाने 2013 सालापासून भारतभूमीवर सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. तर वेस्ट इंडिजला 2002 सालापासून भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकता आलेली नाही. त्यामुळे राजकोटच्या रणांगणातही विराट कोहलीच्या टीम इंडियाचं पारडं जड ठरलं तर आश्चर्य वाटणार नाही.

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेचं वेळापत्रक

भारत मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध 2 कसोटी, 5 एकदिवसीय आणि 3 ट्वेण्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 ते 8 ऑक्टोबरदरम्यान राजकोटमध्ये आणि दुसरा सामना 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.

कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ 21 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची वनडे मालिकेत भिडणार आहेत. वनडे सीरिजचा पहिला सामना 21 ऑक्टोबरला गुवाहाटी, दुसरा 24 ऑक्टोबरला इंदूर, तिसरा 27 ऑक्टोबरला पुणे, चौथा 29 ऑक्टोबरला मुंबई आणि पाचवा 1 नोव्हेंबरला थिरुवनंतपुरममध्ये होणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया - विराट कोहली, के एल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव