जळगाव : काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. जळगावच्या फैजपूरमध्यू जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात, महागाई, इंधन दरवाढ, पिकाला हमीभाव मिळत नाही अशी विविध प्रश्नांविरोधात काँग्रेसनं जनसंघर्ष यात्रा काढून एल्गार पुकारला आहे.


जळगावच्या फैजपूरला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात याच ठिकाणी 1934 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं.


या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसचे नेते जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमधील जनसामान्यांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. जनसामान्याचे प्रश्न, समस्या यांच्या माध्यमातून 2019च्या निवडणुकांआधी लोकांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.


या जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातले सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी सहभागी होतील.