बंगळुरु: आयपीएल 9च्या अंतिम फेरीसाठी खेळविण्यात आलेल्या प्ले ऑफमध्ये काल गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.


 

दोन्ही संघाना विजय महत्त्वाचा होता. कारण की, जिंकणाऱ्या संघाला थेट 29 मेला होणाऱ्या फायनला सामन्याचं तिकीट मिळणार होतं. गुजरात लायन्सची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र डेव्हन स्मिथच्या 73 धावांच्या जोरावर गुजरातने 159 धावांपर्यंत मजल मारली.

 

159 धावांचा पाठलाग करताना आरसीबीचीही सुरुवात चांगली झाली नाही. फॉर्मात असणारा स्टार बॅट्समन विराट कोहली शून्यावरच बाद झाला. एकीकडे आरसीबीचे गडी बाद होत होते. तरीही एबी डिव्हीलियर्स खिंड लढवत होता. एबीनं स्टुअर्ट बिन्नीच्या साथीनं चांगली भागीदारीही रचली.

 

स्टुअर्टनं 9व्या ओव्हरमध्ये 18 धावा घेतल्या होत्या. बिन्नी आणि एबी सामना जिंकून देतील अस वाटत असतानाच जडेजाच्या ओव्हरमध्ये पंचांनी बिन्नीला चुकीच्या पद्धतीनं बाद दिलं.

 

चुकीचा फटका मारायला गेलेल्या बिन्नीला पंचांनी बाद ठरवलं. त्यांच्या या निर्णयामुळे बिन्नी स्वत:ही नाराज होता. पण त्याच्यासोबत विराट कोहली नाराज झाला.

 

पंचांच्या या निर्णयावर कोहली चांगलाच भडकला आणि थेट चौथ्या पंचांनाच जाऊन भेटला. एकतर आरसीबीची सुरुवात चांगली झाली नव्हती आणि त्यांना फायनलचं तिकीट मिळविणयासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा होता.

 

रिप्लेमध्ये देखील स्पष्ट झालं की, पंचांचा बिन्नीला बाद देण्याचा निर्णय चूकीचा होता. पण डिव्हिलियर्सने 47 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 79 धावांची खेळी करत बंगलोरला एकहाती विजय मिळवून दिला.