ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना मिळत असलेल्या फाईव्ह स्टार सुविधांबद्दल आता राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाणे तुरुंगातल्या भ्रष्टाचाराबद्दल एक निनावी पत्र मिळालं होतं. यामध्ये कैद्यांना सुविधा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. याबाबतची बातमी 'मीड डे' या दैनिकाने प्रकाशित केली आहे.


 

या पत्रात ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव हे आपल्या निवडक अधिकाऱ्यांसोबत कैद्यांकडून पैसे उकळत असल्याचं म्हटलं आहे. आपल्या परिवाराला अधिक वेळ भेटण्यासाठी 25 हजार, पोलिसांच्या कँटीन ड्युटीसाठी 1 लाख रक्कम स्वीकारली जात असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.

 

त्यामुळे या पत्राची गंभीर दखल घेत तुरुंग विभागाच्या महानिरीक्षक स्वाती साठे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

 

धक्कादायक म्हणजे स्वत: तुरुंग अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर ठाणे कारागृहातील कैद्यांना पैशाच्या बदल्यात ऐशोआराम करण्याची परवानगी दिल्याचा आरोप, या पत्रात करण्यात आला आहे.  याशिवाय कैद्यांना मोबाईलवर बोलण्यास परवानगी, अंमली पदार्थ, दारु याचाही जेलमध्ये पुरवठा होत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

 

पत्रात हिरालाल जाधव यांच्यावर केलेले आरोप

 

हिरालाल जाधव यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. या पत्रानुसार 2010 मध्ये प्रशिक्षणादरम्यान जाधव यांनी प्रशिक्षणार्थी महिला सहकाऱ्यासोबत असभ्य वर्तन केलं होतं. त्यामुळे त्यांना निलंबित केल्याचं पत्रात म्हटलं आहे.

 

मंत्री आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांची मर्जी राखल्यामुळेच, तसंच 25 लाखांच्या मोबदल्यात त्यांना कारागृह अधीक्षकपद मिळाल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. हे पैसे त्यांनी लाचेच्या रकमेतून वसूलही केल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

 

अंडासेलमध्ये हिरालाल जाधवांचा वावर

खतरनाक आणि मोठ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना ज्या अंडासेलमध्ये ठेवण्यात येतं, त्या अंडासेलमध्ये हिरालाल जाधवांचा सातत्याने वावर असल्याचं पत्रात म्हटलं आहे. मोठ्या कैद्यांसोबत अर्धा-अर्धा तास चर्चा करुन, त्या कैद्यांना फोन करण्यासाठी स्वत:चा मोबाईल पुरवत असल्याचा धक्कादायक दावाही या पत्रात करण्यात आला आहे.

 

कारागृहातील रेटकार्ड

ठाणे कारागृहात कैद्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांच्या बदल्यात घेण्यात येणाऱ्या पैशाचं रेटकार्डच पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यानुसार फॅन आणि चांगल्या बराकसाठी एक लाख रुपयांपर्यंतचा दर आहे.

* कैद्याची कुटुंबासोबत भेट - 25,000 रुपये

* कॉन्स्टेबल कॅण्टीन ड्युटी - 50 हजार

*फाईव्ह स्टार ट्रिटमेंट - 3 लाख ते 25 लाख

 

जेलरला कोणी किती लाच दिल्याचा पत्रात उल्लेख?

*सुरेश बिजलानी 10 लाख

*विश्वनाथ मारण्णा 3 लाख

*अनुराग गर्ग - 25 लाख