मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम वेश बदलून वृद्ध भिकाऱ्याच्या रुपात भीक मागत असल्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे सोनूला खरंच एक वृद्ध समजून नाश्त्यासाठी एका तरुणाने 12 रुपये दिले होते. या तरुणाशी भेट घेण्याची इच्छा सोनूने व्यक्त केली होती. सोनूची इच्छा प्रत्यक्षात आली असून दोघांची अखेर भेट घडली आहे.


 
'बीईंग इंडियन'च्या 'रोडसाईड उस्ताद' या व्हिडीओत मुंबईच्या रस्त्यावर एक भिकारी हार्मोनियम वाजवून गाणं गाताना दिसला. त्याचं गाणं ऐकून तिथे एकच गर्दी झाली. लोक त्याच्या सुरेल आवाजाला आणि गाण्याला दाद देत होते. त्यानंतर तो भिकारी तिथून त्याचं सामान आवरुन उठला आणि निघाला.

 
भिकाऱ्याच्या वेशात गाणारा दुसरा-तिसरा कोणीही नसून प्रसिद्ध गायक सोनू निगम होता. त्याने 'कल हो ना हो' सिनेमातील हर घडी बदल रही है हे गाणं गायलं. गाणाऱ्या भिकाऱ्याचा सुरेल गळा ऐकण्यासाठी तिथे जमलेल्या कोणालाही त्याला ओळखता आलं नाही. यावेळी एका तरुणाने त्याच्याशी हात मिळवला आणि विचारलं, "अंकल आपने नाश्ता किया या नहीं?"

 
'बीईंग इंडियन' मंगळवारी पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोनू 'क्रेझी दिल मेरा' या आगामी गाण्यानिमित्त फेसबुकवरुन चाहत्यांशी लाईव्ह चॅट करत होता. हे चॅट सुरु असतानाच सोनूला 12 रुपये देणारा शहबाज अली सैयद त्याच्या घरी प्रवेश करतो आणि शिरताच सोनूला आलिंगन देतो. शहबाजशी भेट हे सोनूसाठी सरप्राईझ होतं, त्याचप्रमाणे शहबाजलाही आपण कोणाची भेट घेणार हे माहित नव्हतं.

 
'मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. म्हणून तुम्ही गात बसलेल्या जागी मी पुन्हा गेलो. पण तोपर्यंत तुम्ही निघून गेला होतात. त्यानंतर जेव्हा व्हिडिओमध्ये तुम्ही माझं कौतुक केल्याचं मी ऐकलं, तेव्हा मला खूप गहिवरुन आलं. मी आयुष्य जगलोय, असं मला काही काळासाठी वाटलं' अशा भावना शहबाजने व्यक्त केल्या आहेत.

 
"हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. ज्या तरुणाने नाश्त्याचं विचारलं होतं, त्याने मला हळूच 12 रुपये दिले होते. ही माझ्या आयुष्यातील अमूल्य कमाई आहे. हे 12 रुपये मी माझ्या ऑफिसमध्ये फ्रेम करुन लावणार आहे." असं सोनूने व्हिडिओच्या शेवटी सांगितलं होतं. त्यानुसार त्याने खरोखरच ते 12 रुपये फ्रेम करुन ठेवले आहेत. सोनूने ती फ्रेम दाखवताच शहबाजला भरुन आलं.

 
'ते 12 रुपये देताना आपण एक मोठं काम करतोय याची कल्पनाही नव्हती. मी तर फक्त एका उपाशी गायकाला खायला दिलं होतं. त्यामुळे याबाबत उल्लेखही कुठे केला नाही.' असं शहबाज म्हणाला. सोनूने शहबाजच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्याच्या घरी आई आणि दोन बहिणी असतात. हा अनपेक्षित अनुभव सोनू आणि शहबाज या दोघांनाही सुखावून गेला आहे.


सोनू आणि चाहत्याच्या भेटीचा व्हिडिओ :


 



संबंधित बातम्या  :


 

VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर भीक मागणारा हा गायक कोण?


 

पाहा सोनू निगमचं अनोखं रुप :