इंदूर : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज (14 जानेवारी) इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यामुळे किंग विराट कोहलीचे (Virat Kohli) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होईल. एका वर्षाहून अधिक कालावधीनंतर तो टी-20 आंतरराष्ट्रीय खेळणार आहे. २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो या फॉरमॅटमध्ये शेवटचा दिसला होता.






तर कोहली चौथा क्रिकेटपटू ठरेल 


प्रदीर्घ कालावधीनंतर टी-20 मध्ये पुनरागमन केल्यामुळे विराट कोहलीवर सर्वांची नजर असेल. यासोबतच या सामन्यात तो आणखी एक विक्रम करतो का? याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. या आकड्यापासून तो फक्त 35 धावा दूर आहे. इंदूरमध्ये जर त्याने 35 धावांची इनिंग खेळली तर या मोठ्या आकड्याला स्पर्श करणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरेल.




विराट कोहलीने आतापर्यंत T20 क्रिकेटमध्ये (इंटरनॅशनल + डोमेस्टिक टी20 + फ्रँचायझी लीग) 11,965 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत त्याच्या पुढे असलेल्या तीन फलंदाजांनी 12 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे, ज्याने टी-20 क्रिकेटमध्ये 14,562 धावा केल्या आहेत. दुसरे स्थान शोएब मलिकचे आहे. या पाकिस्तानी फलंदाजाने T20 क्रिकेटमध्ये 12,993 धावा केल्या आहेत. किरॉन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने आतापर्यंत 12,430 धावा केल्या आहेत.


16 वर्षांपासून टी-20 क्रिकेट खेळत आहे


विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 374 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 41.40 च्या सरासरीने 11,965 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 133.35 होता. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 8 शतके आणि 91 अर्धशतके आहेत. तो T20 आंतरराष्ट्रीय आणि IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 11,965 धावांपैकी त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 4,008 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये 7,263 धावा केल्या आहेत.


 इतर महत्वाच्या बातम्या