Latur Crime News : लातूर (Latur)जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, जुन्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पाचपैकी तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महेश उत्तम सूर्यवंशी (वय 20 वर्ष) आणि विकास शिवाजी सूर्यवंशी (वय 23 वर्ष, दोघेही रा. रावणकोळा, ता. जळकोट, जि. लातूर) असे मयत चुलत भावांचे नावं आहेत. 


अधिक माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात रावणकोळा येथे काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्या चुलत भावाचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला आहे. धारदार शस्त्राने पोटात वार करत या दोन भावांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रावणकोळ येथे हे दोन्ही भाऊ ऑनलाइन फॉर्म आणि कॅम्पुटरचे दुकान चालवत होते. मात्र, जुन्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि दोन्ही भावांच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या केली गेली आहे. 


जुन्या वादातून हल्ला....


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी प्रकाश मुरारी सूर्यवंशी आणि त्याच्याबरोबरच्या इतर चार जणांनी हातात धारदार शस्त्र घेत महेश आणि विकास या दोन्ही चुलत भावावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही भावाचा जागीच मृत्यू झाला होता. मागील काही वर्षापासून यांच्यामध्ये वाद होता. जुन्या वादाची कुरापत काढून पुन्हा भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरत मुख्य आरोपी प्रकाश मुरारी सूर्यवंशी आणि इतर चार जणांनी या दोन भावावर हल्ला केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


तीन आरोपींना अटक, एका महिलेचाही समावेश...


घटनेची माहिती जळकोट पोलीस ठाण्याला कळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह जळकोट येथील दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तात्काळ पाचपैकी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. तीन जणांपैकी एक महिलेचा समावेश आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे त्यासाठी दोन पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


परिसरात एकच खळबळ... 


लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात रावणकोळा येथे जुन्या वादातून दोन चुलत भावांची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर रावणकोळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. तसेच, पोलिसांकडून देखील परिसरात पोलीस बंदोबस्त लावल्याचे पाहायला मिळत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Navi Mumbai Crime : नवी मुंबई सीवूड्स भागात बांधकाम व्यवसायिकाची गोळ्या झाडून हत्या; अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा