Virat Kohli : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी (17 जानेवारी) खेळला गेलेला टी-20 सामना खूपच रोमांचक झाला. निकालासाठी दुसरी सुपर ओव्हर खेळावी लागली. हा सामना केवळ शेवटच्या क्षणांमध्ये रोमांचक नव्हता तर सुरुवातीपासूनच या सामन्यात चढ-उतार होते.
टीम इंडियाने 22 धावांत 4 विकेट गमावून 200 चा टप्पा पार केला. रोहित शर्माने बऱ्याच कालावधीनंतर टी-20 मध्ये मोठी खेळी खेळली. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सुद्धा बेधडक फलंदाजी केली. मोठी धावसंख्या उभारूनही टीम इंडिया प्रत्येक चौकार वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसली. किंग विराट कोहलीचा एक अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला. त्याने दमदार क्षेत्ररक्षण करत आपल्या संघाच्या 4 धावा वाचवल्या.
विराटचे अप्रतिम क्षेत्ररक्षण
अफगाणिस्तानला 20 चेंडूत 48 धावांची गरज असताना वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर करीम जनातने दमदार शॉट मारला. हा चेंडू सीमारेषेबाहेर जाताना स्पष्ट दिसत होता. पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या विराट कोहलीने अशी उडी मारली की त्याने चेंडूला 6 धावांवर जाण्यापासून रोखले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या फलंदाजांना केवळ दोन धावा करता आल्या. विराटचा हा प्रयत्न असा होता की संपूर्ण स्टेडियममध्ये त्याला टाळ्यांचा कडकडाट झाला. या फिल्डिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. विराटने हा षटकार वाचवला नसता तर कदाचित सामना सुपर ओव्हरमध्ये गेला नसता आणि टीम इंडिया आधीच हरली असती, अशी स्थिती होती.
या सामन्यात विराटने एक लांब धाव घेत शानदार झेल घेतला. असे अनेक प्रयत्न भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. कदाचित या प्रयत्नांमुळेच टीम इंडिया सामना बरोबरीत आणू शकला आणि नंतर विजयाची नोंद करू शकला.
ट्राॅफी स्वीकारण्यासाठी सुद्धा विराटची हटके एन्ट्री
विरोधी संघांवर नेहमी तुटून पडणारा विराट अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भलत्याच मूडमध्ये दिसून आला. दोन ओव्हरच्या सुपर ओव्हर थरारानंतर सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने चषक स्वीकारला. यावेळी इतर खेळाडू विराटची वाट पाहत असताना विराटने दोन्ही पाय एकाचेवळी मुलांप्रमाणे घासत येत जागेवर आला. या घटनेचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या