मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, 23 जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने (Maharashtra State Backward Classes Commission) याबाबत माहिती दिली आहे. 23 जानेवारीपासून सुरु होणारे हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत संपण्याच्या सूचना देखील राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महसूल विभागाअंतर्गत मराठा समाजाचे संपूर्णपणे सर्वेक्षण केले जाणार आहे. 


23 जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण आदेश मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 20 जानेवारीला जिल्हाधिकार्यालय आणि महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्यानंतर वार्ड व तालुका या ठिकाणी हे अधिकारी 20 आणि 21 तारखेला प्रशिक्षण देतील. हे सर्वेक्षण 23 जानेवारीला सुरू करून 31 जानेवारीपर्यंत हे संपण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना आहेत. तसेच, हे सर्वेक्षण करत असताना सॉफ्टवेअर कसं वापरायचं या संदर्भात तीन दिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल जाणार आहेत. सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त हे नोडल ऑफिसर म्हणून काम करणार असल्याचे देखील आदेशात म्हटले आहेत. 


सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले आहे...


याबाबत मागासवर्ग आयोगाच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, "महाराष्ट्र शासनाकडील 13 नोव्हेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. त्याअनुषंगाने राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे,"असे या पत्रात म्हटले आहे.


असे असणार मराठा सर्वेक्षण...



  • 20 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याच्या व वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना सॉफ़्टवेअर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.

  • 21 व 22 जानेवारी 2024 रोजी वॉर्ड व तालुक्याचे प्रशिक्षक संबंधीत तालुक्याच्या, वॉर्डच्या ठिकाणी तालुक्यातील-वॉर्डमधील सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील.

  • 23 जानेवारी 2024 पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होईल. हे सर्वेक्षण 31 जानेवारी 2024 पुर्वी पुर्ण करावयाचे आहे.

  • या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फ़त ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! कुणबी प्रमाणपत्राबाबत आज अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता; मराठा समाजाला दिलासा मिळणार?