नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना यंदाचा खेलरत्न जाहीर करण्याचा केंद्रीय क्रीडा खात्याचा निर्णय पैलवान बजरंग पुनियाला पटलेला नाही. याविरोधात त्याने कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
बजरंगने गेल्या चार वर्षांत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची दोन आणि एशियाडची दोन पदकं पटकावली आहेत. या कामगिरीच्या निकषावर खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत त्याला सर्वाधिक 80 गुण मिळत आहेत. त्यामुळे यंदाचा खेलरत्न आपल्यालाच मिळायला हवा असा बजरंगचा दावा आहे.
या प्रकरणात केंद्रीय क्रीडा खात्याने आपल्यावरचा अन्याय दूर करण्याची मागणी त्याने केली आहे. बजरंगने केंद्रीय क्रीडा खात्याला आज सायंकाळची मुदत दिली आहे. आपल्यावरचा अन्याय आज दूर झाला नाही, तर उद्या न्यायालयाचं दार ठोठावण्याचा इशारा बजरंग पुनियाने दिला आहे.
विराटला शून्य गुण असूनही पुरस्कार का?
विराटच्या परफॉर्मन्स शीटवर एकही गुण जमा नसतानाही त्याला पुरस्कार देण्यात येणार आहे, कारण, क्रिकेटच्या मानदंडांनुसार हे नियम त्याला लागू होत नाही. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मीराबाई चानूच्या पुढे सहा खेळाडू असे होते, ज्यांचे गुण तिच्यापेक्षा अधिक होते. पैलवान बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या नावावर प्रत्येकी 80 गुण आहेत, जे सर्वाधिक आहेत. दरम्यान, ही निवड लोकांच्या माध्यमातून हात वर करुन करण्यात आली होती, ज्यात निश्चित करण्यात आलं, की यंदाचा खेलरत्न कुणाला जाणार.
काय आहे क्रिकेटची पद्धत?
क्रिकेटसाठी गुण पद्धती लागू होत नाही. शिवाय हा खेळ ऑलिम्पिकमध्येही नाही. त्यामुळे क्रिकेटपटूंना सहमतीच्या आधारावर निवडलं जातं, ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असते. पॅनलमधील एका सदस्याने हे मान्य केलं, की विराटच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. गुण पद्धती ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट लक्षात ठेवून निश्चित केली जाते. मग विराटची कामगिरी कशी ओळखली जाऊ शकते, असा मुद्दा चर्चेत आला होता. विराटचं नाव 2016 आणि 2017 मध्येही वगळण्यात आलं होतं.
गुणांची गरज कशामुळे?
एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, विराटची जेव्हा निवड केली जाणार होती, तेव्हा लोकांनी हात वर करुन त्याच्या नावाला पसंती दिली आणि विराटची निवड करण्यात आली. क्रिकेटपटूंच्या निवडीसाठी अजून गुण पद्धती लागू नाही, तर इतर खेळाडूंची निवड गुण पद्धतीद्वारे केली जाते.
मीराबाई आणि श्रीकांत यांच्या प्रकरणात सात जणांनी मीराबाईचं नाव घेतलं, तर सहा जणांनी श्रीकांतला पसंती दिली. ज्यानंतर पुरस्कारासाठी मीराबाईची निवड करण्यात आली. अकरा सदस्यीय समितीकडे हा अधिकार असतो, की ते या खेळाडूंना 20 गुण आपल्यावतीने देऊ शकतात. ज्यानंतर खेळाडूंना ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कामगिरीच्या आधारावर गुण दिले जातात. गुणतालिकेत 17 पैकी केवळ 11 खेळाडूंना निवडण्यात आलं, ज्यांना समितीने गुण दिले.
पुढील पद्धतीने गुण देण्यात आले
चानू (19), कोहली (18.5), श्रीकांत (18), विनेश (13), रोहन बोपन्ना (12), बजरंग पुनिया (12), नीरज चोप्रा (15), दीपा मलिक (12), विकास कृष्णन (14) मणिका बत्रा (13) आणि पॅरा रेसलर वीरेंद्र सिंह (12)
यानंतर एकूण गुण चानू 63 (44+19), पुनियाला 92 (80+12), फोगाटला 93 (80+13), मलिकला 90.4 (78.4+12), बत्रा 78 (65+13) आणि विकासला 66 (52+14) गुण मिळाले.
यावर्षीच्या खेलरत्न पुरस्कार समितीमध्ये दिल्ली हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती इंदरमीत कौल, माजी खेळाडू अश्विनी नचप्पा, कमलेश मेहता, समरेश जंग आणि विमल कुमार यांचा समावेश होता.
शून्य गुण असलेल्या विराटला खेलरत्न, 80 गुण मिळवूनही पुनियाला पुरस्कार नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2018 10:00 AM (IST)
विराटला शून्य गुण असूनही पुरस्कार देण्यात आला, कारण क्रिकेटसाठी गुणांची पद्धती लागू नाही. पण दुसरीकडे 80 गुण असलेल्या पुनियालाही वगळण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -