वसई : वसई आणि विरारमध्ये सध्या नागरिक दहशतीखाली आहेत. अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार करणारा सीरिअल रेपिस्ट आता वसई, विरारमध्ये दाखल झाला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, तसेच पालघर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींना या नराधमाने आपली शिकार बनवलं आहे.
सीरिअल रेपिस्ट वसई, विरार आणि नालासोपारा या भागात दाखल झाला आहे. नालासोपाऱ्यात चार दिवसात दोन मुलींना त्याने आपली शिकार बनवलं आहे. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंग असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सदर घटनेने परिसरात मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी आता स्वतःच ‘जागते रहो’चा नारा दिला आहे.
रात्रीच्या अंधारातही हातात काठी घेऊन पालक पहारा देत आहेत. या घटनेचं वृत्त समोर आल्यापासूनच नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. हा वासनांध नराधम 25 ते 35 वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. हा नराधम 9-14 वर्षे वयोगटातील लहान मुलींवर पाळत ठेवतो. मुलींच्या मागे जातो, तुझ्या वडिलांनी मला तुला घ्यायला पाठवलं आहे, तुझ्या वडिलांचं पार्सल आलं आहे, अशा बतावण्या करून मुलींना सोबत घेऊन जातो.
मुलींना निर्जनस्थळी नेऊन हा नराधम अतिप्रसंग करतो. सध्या त्याच्यावर नवी मुंबईत सहा, मुंबईत एक, ठाणे शहर येथे एक, ठाणे ग्रामीण येथे दोन, तर पालघर जिल्ह्यात दोन घटना घडल्या आहेत. चार दिवसात पालघर जिल्हयातील तुलिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घटना घडल्या आहेत.
एका अल्पवयीन मुलीवर या नराधमाने बलात्कार केला आहे. तर दुसरी या नराधमाच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी झाल्याने तिचा विनयभंग केला आहे. नालासोपारा येथे दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हातात काठी घेऊन नागरिक स्वतः पहारा देत आहेत. आळीपाळीने टीम करून, ही मंडळी सध्या आपल्या परिसरात पाळत ठेवणार आहेत. अनोळखी दिसणाऱ्या व्यक्तींची चौकशीही केली जात आहे.
वसई, विरारमध्ये सीरिअल रेपिस्टची दहशत, नागरिकांचा 'जागते रहो'चा पहारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2018 07:56 AM (IST)
मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, तसेच पालघर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींना या नराधमाने आपली शिकार बनवलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -