मुंबई : पैलवान बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटची भारतीय कुस्ती महासंघाकडून तर भारताची अव्वल नेमबाज हिना सिद्धू आणि ट्रॅप शूटर अंकुर मित्तलची नॅशनल शूटींग फेडरेशनकडून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
बजरंग पुनियानं नुकत्य़ाच झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं. तर विनेश फोगाट गेल्या वर्षीच्या एशियाडमध्ये सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. या आणि गेल्या दोन वर्षातल्या कामगिरीच्या आधारेच विनेश आणि बजरंगची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली.
याशिवाय कुस्ती महासंघानं महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारेसह हरप्रीत सिंग, पूजा ढांडा आणि दिव्या काकरन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
जागतिक शूटींग क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली भारतीय हिना सिद्धूनं नेमबाजी विश्वचषक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर अंकुर मित्तलनं गेल्या दोन वर्षात आपल्या कामगिरीत कमालीचं सातत्य राखलं आहे. याच कामगिरीरीच्या आधारे शूटींग फेडरेशननं खेलरत्न या भारतातल्या सर्वोच्च क्रीडा सन्मानासाठी हिना आणि अंकुरची शिफारस केली आहे.