शिर्डी : शिर्डी विमानतळावर दिल्लीहून आलेलं स्पाईसजेटचं विमान धावपट्टीवरुन घसरण्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे विमानातील 162 प्रवासी तब्बल साडेतीन तास अडकून पडले होते. विमान धावपट्टीवर स्थिर करुन प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. याआधीही एअर इंडियाचं विमान याठिकाणी घसरलं होतं.


दिल्लीहून शिर्डीकडे येणारे 190 आसनी विमान शिर्डी धावपट्टीवर उतरले. मात्र विमान टर्मिनलकडे जात असताना अचानक धावपट्टीवरून खाली उतरले. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळही उडाली. अचानक घडलेल्या या घटनेने प्रवासी मात्र कमालीचे घाबरले.



वैमानिकाच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र गेल्या काही महिन्यात विमान धावळट्टीवरून उतरण्याची ही दुसरी वेळ असल्याने चिंता वाढली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे एअर इंडियाचं विमान धावपट्टीवरुन खाली उतरलं होतं.


विमान धावपट्टीवर घसरल्यानंतर काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र विमानतळ प्रशासनाने त्यांना धीर दिल्याने प्रवाशी शांत झाले. यानंतर तब्बल तीन तासाहून अधिक वेळ बचावकार्य सुरु होते. सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवल्यानंतर विमान पूर्ववत धावपट्टीवर आणण्याचे काम सुरु झालं आहे.