वसई : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा भोगळ कारभार समोर आला आहे. नालासोपारा आणि बोईसर विधानसभा क्षेत्रात काही मतदान केंद्रावर एकच ईव्हीएम मशीन आहे. तसेच काही ठिकाणी ईव्हीएम मशीन धिम्या गतीने सुरु असल्याने मतदान प्रक्रिया संपल्यानंतरही मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक मतदार तब्बल 4-4 तास रांगेत उभे राहून मतदान करत आहेत.


नालासोपारा आणि बोईसरप्रमाणे मुंबई अहमदाबाद महार्गानजीकच्या पेल्हार गावातदेखील अशीच परिस्थिती आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. संध्याकाळी 6 वाजता (मतदान प्रक्रिया संपण्याची वेळ)या मतदान केंद्राबाहेर मतदारांची तब्बल 100 मीटर लांब रांग होती. मतदान केंद्रावर एकच मशीन असून ती मशीन फार धिम्या गतीने सुरु आहे.

नालासोपारा पूर्वेकडील धानीव बाग येथील शाळेत मतदान सुरु आहे. येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला दोन मशीन मागवल्या होत्या. परंतु ऐन वेळी बुथवर केवळ एकच मशीन ठेवली. त्यामुळे या मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुपारच्या कडक उन्हात मतदारांचे प्रचंड हाल झाले. परिसरातील अनेक मतदान केंद्रांबाहेर अद्याप मतदारांच्या रांगा असल्यामुळे मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु ठेवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.