अंकारा (तुर्की): क्रीडाप्रेमी एखादा सामना पाहण्यासाठी काय करेल हे सांगता येत नाही. अनेक क्रिकेटप्रेमी सामने पाहण्यासाठी झाडावर, इमारतीवर चढलेले आपण पाहिलं आहे.
क्रिकेटप्रेमींबाबतचे हे किस्से आपल्याला माहित आहेत, मात्र जर तो फुटबॉलप्रेमी असेल, तर सामना पाहण्यासाठी तो काय करु शकतो, याचं एक भन्नाट उदाहरण समोर आलं आहे.
फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी एका बहाद्दराने चक्क क्रेन भाड्याने घेतली आणि त्यावर चढून ती मॅच पाहिली.
तुर्की कप फुटबॉल स्पर्धेदरम्यान हे मजेशीर चित्र पाहायला मिळालं.
बंदी घातल्याने क्रेन आणली
एक चाहता डेनिझ्लिस्पॉर फुटबॉल क्लबचा खूप मोठा फॅन आहे. मात्र त्याच्यावर मैदानात येण्यास वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे.
पण आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहू न शकणं हे त्याच्यासाठी आभाळ कोसळण्यासारखं होतं. त्यामुळे त्याने शक्कल लढवून, थेट क्रेन भाड्याने घेऊन ती स्टेडियम बाहेर लावली.
क्रेनवर चढून हा बहाद्दर मोठ्या ऐटित फुटबॉलचा सामना पाहू लागला. ना कोणता व्यत्यय, ना कोणाचा त्रास...
क्रेनवर उभा, हाती झेंडा
बरं क्रेनवर चढून केवळ मॅच पाहणंच नाही तर हा बहाद्दर आपल्या क्लबला प्रोत्साहन देण्यासाठी झेंडाही घेऊन गेला होता. क्रेनवर उभं राहून, झेंडा फडकवत, तो आपल्या टीमला प्रोत्साहन देत होता.
महत्त्वाचं म्हणजे तो प्रोत्साहन देत असलेला संघ 5-0 अशा मोठ्या फरकाने जिंकला.
सध्या सोशल मीडियावर या जबरा फॅनचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. मात्र या फॅनला मैदानात येण्यास बंदी का घालण्यात आली होती, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
हा फॅन आता यापुढेही हीच शक्कल लढवणार, की मैदान प्रशासन त्याला मैदानात प्रवेश देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.