बंगळुरु : सलामीवीर ख्रिस लीनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला.


या सामन्यात बंगलोरनं कोलकात्याला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. कोलकात्यानं हे आव्हान पाच चेंडू आणि सहा विकेट राखून पार केलं. कोलकात्याचा सलामीवीर ख्रिस लीननं 52 चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह 62 धावांचं योगदान दिलं. तर रॉबीन उथप्पानं 36 धावा फटकावल्या.

आयपीएलमधला कोलकात्याचा हा चौथा विजय ठरला. तर विराटच्या बंगलोरचा सात सामन्यातला हा पाचवा पराभव होता.

दरम्यान, केकेआरने या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. आरसीबीकडून कर्णधार विराट कोहलीनं सर्वाधिक 68 धावा केल्या. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.