नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाने आज दमदार कामगिरी करुन पॅरीस ऑलिंम्पिक (Paris Olympic) स्पर्धेत दणदणीत विजय मिळवला. कास्य पदकासाठी भारत विरुद्ध स्पेनस असा सामना पॅरीसच्या स्टेडियममध्ये रंगला होता. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत याने चतुराईने केलेले दोन गोल आणि गोलकीपर पीआर श्रीजेशने (Shrijesh) दाखवलेली लवचिकता कामी आली. श्रीजेशने शेवटच्या 45 मिनिटांपर्यंत स्पेनच्या खेळाडूंना गोलसाठी झुंजवत ठेवलं. त्यामुळेच, भारताला स्पेनविरुद्ध विजयाचा मार्ग सोपा झाला आणि भारताने पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत कास्य पदकावर आपलं नाव कोरलं. मात्र, या विजयाच्या आनंदात भारतीय असतानाच, टीम इंडियाचा गोलकीपर श्रीजेशने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून (Hockey) निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे, भारतीय हॉकी चाहत्यांच्या आनंदात काहीसा भावूक क्षण आला.
केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्याच्या किझक्कम्बलम गावातील शेतकरी कुटुंबातील पीआर श्रीजेश यांचा प्रवास हॉकीच्या टीमचा गोलकीपर इथपर्यंत पोहचला. भारताच्या हॉकी टीममध्ये पीआर श्रीजेश यांनी महत्त्वाचं स्थान निर्माण केलं होतं. भारताच्या हॉकी टीमचा कर्णधार म्हणून देखील पीआर श्रीजेश याने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या दहांवर्षांपेक्षा अधिक काळ पीआर श्रीजेश भारताच्या हॉकी संघाचा आधारस्तंभ राहिले आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी भारताच्या हॉकी टीममध्ये पदार्पण केलं होतं.श्रीजेशने 3 ऑलिम्पिकमध्ये भारताच्या संघाचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. त्याचा हॉकीमध्ये करिअर करण्यापूर्वी अॅथलेटिक्सकडे ओढा होता. स्प्रिंट, लांब ऊडी आणि व्हॉलीबॉलमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, प्रशिक्षक जयकुमार आणि रमेश कोलप्पा यांच्या मार्गदर्शनात श्रीजेशने हॉकीकडे आपलं लक्ष्य वळवलं.
कास्य जिंकून हॉकीला निरोप
स्पेन विरुद्ध भारताचा आजचा सामना गोलकीपर पीआर श्रीजेशचा शेवटचा सामना. श्रीजेशने ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीच ही स्पर्धा शेवटची असल्याचं जाहीर केलं होतं. भारतीय संघाचा पीआर श्रीजेशला सुवर्णपदकाच्या विजयासह निरोप देण्याचा प्रयत्न होता. मात्र, जर्मनीविरुद्ध पराभव झाल्यानंतर कांस्य पदकाची लढत भारताला स्पेन विरुद्ध लढावी लागली. पीआर श्रीजेशनं कांस्य पदकाच्या लढतीपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना मांडल्या होत्या. त्यामुळे, कास्य पदकाची कमाई केल्यानंतर श्रीजेशची निवृत्तीही जाहीर झाली आहे.
टोक्यो ऑलिंपिकमध्येही विजय
पीआर श्रीजेशने 2006 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतीय हॉकीमध्ये पदार्पण केलं. हॉकी इंडियाच्या वरिष्ठ टीममध्ये श्रीजेशला 2010 मध्ये संधी मिळाली. तेव्हापासून भारतीय हॉकी संघात अनेक बदल होत गेले मात्र, पीआर श्रीजेश यांच्यावर भारतीय हॉकीच्या व्यवस्थापनाचा विश्वास कायम होता. पीआर श्रीजेशने भारतासाठी आतापर्यंत 328 मॅच खेळल्या आहेत. श्रीजेशने तीन ऑलिम्पिकमध्ये देखील सहभाग घेतला होता. राष्ट्रकूल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वकप स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. टोक्यो ऑलिम्पिमध्ये भारताच्या हॉकी संघाला 41 वर्षानंतर कांस्य पदक मिळालं होतं, त्यामध्ये पीआर श्रीजेशचं योगदान महत्त्वाचं होतं. तर, आजच्या आणि श्रीजेशच्या अंतिम सामन्यातही त्याचं योगदानचं भारताला पॅरीस विजयापर्यंत पोहोचवू शकलं. आजच्या सामन्यापूर्वी हॉकी इंडियानं 'विन इट फॉर श्रीजेश' अभियान सुरु केलं होतं.
हेही वाचा
मोठी बातमी : भारताच्या हॉकी संघाची कमाल, 'सरपंच' हरमनप्रीतची धमाल, ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक