पॅरिस : भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी सामना पार पडला. भारताला उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं कांस्य पदाकासाठी स्पेन विरोधात लढत द्यावी लागली.  कांस्य पदकाच्या लढतीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं केलेले दोन गोल आणि पीआर श्रीजेशचा भक्कम बचाव या जोरावर भारतानं कांस्य पदकावर नाव कोरलं. या विजयासह भारतीय हॉकी संघानं पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीला अनोखा सलाम केला आहे. 


भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची लढत रोमांचक झाली. भारत आणि स्पेन यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये दमदार खेळ केला. यामुळं दोन्ही संघांना गोल करता आला नाही. भारताविरुद्ध दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेननं पेनल्टी स्ट्रोकचा लाभ उठवत गोलं केला.  स्पेनसाठी हा गोल मार्क मिरालेस यानं केला. 


भारताचा पलटवार 


स्पेननं आघाडी घेतल्यानंतर भारतानं जोरदार कमबॅक केलं. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत भारतीय संघानं आक्रमक खेळ करत मॅचमध्ये बरोबरी साधली होती. 



हरमनप्रीत सिंगनं भारतासाठी पहिला गोल 30 व्या मिनिटाला केला होता. तर, दुसरा गोल हरमनप्रीत सिंगनं 33 व्या मिनिटाला केला. यामुळं भारतानं मॅचमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. भारतानं यापूर्वी स्पेन विरोधात झालेल्या दोन्ही मॅच जिंकल्या होत्या. भारतानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. 


गोलकीपर पीआर श्रीजेश याचा अखेरचा सामना भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेश यानं ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वी ही स्पर्धा शेवटची असल्याचं जाहीर केलं होतं. भारतीय संघाचा  पीआर श्रीजेशला सुवर्णपदकाच्या विजयासह निरोप देण्याचा प्रयत्न होता. मात्र, जर्मनीविरुद्ध पराभव झाल्यानंतर कांस्य पदकाची लढत भारताला स्पेन विरुद्ध लढावी लागली. पीआर श्रीजेशनं कांस्य पदकाच्या लढतीपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना मांडल्या होत्या.


पीआर श्रीजेशनं म्हटलं की मी आज शेवटचं गोलपोस्ट समोर उभा राहणार आहे. माझं मन अभिमान आणि आभारानं भारावून गेलेलं आहे. एका छोट्या मुलापासून भारताच्या सन्मानाचं रक्षण करणारा व्यक्ती हा प्रवास असाधारण होता.  आज भारतासाठी शेवटची मॅच खेळत आहे. प्रत्येक वाचवलेला गोल, प्रत्येक डाईव माझ्या मनात असेल. भारतानं माझ्यावर विश्वास ठेवला यासाठी आभार, असं पीआर श्रीजेश म्हणाला.


संबंधित बातम्या 


Aman Sehrawat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आशेचा किरण, अमन सहरावत उपांत्य फेरीत, नीरज चोप्रापूर्वी मैदानात उतरणार