मुंबई : पाच दिवसांचं कसोटी क्रिकेट वनडेवर आलं, त्यानंतर 50 षटकांचा सामना 20 षटकांवर आणला. आता हा शॉर्ट फॉर्मेट आणखी लहान करण्याचा सल्ला पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसिम अक्रमने दिला आहे. ऑलिम्पिकसाठी दहा षटकांचे क्रिकेट सामने आयोजित करावेत, असं मत अक्रमने व्यक्त केलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट वगळता फुटबॉल, हॉकी, टेनिस सारख्या खेळांचा समावेश आहे. क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करावं, यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. मात्र ऑलिम्पिक, एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश होण्यास अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी शॉर्टेस्ट फॉर्मेट तयार करावा, असं मत वसिम अक्रमने व्यक्त केलं आहे. अमेरिका, कॅनडासारख्या देशात क्रिकेटच्या प्रसारासाठी टी10 फ्रँचायझी क्रिकेट लीग सुरु करावेत, अशा सूचना अक्रमने दिल्या आहेत.

लहान फॉर्मेट हा क्रिकेटचं भविष्य आहे. टी20 पेक्षा टी10 हा अत्यंत उपयुक्त फॉर्मेट आहे, असं वसिम अक्रम म्हणतो. टी20 मधील ऑफेन्सिव टीम्स 50 षटकांच्या सामन्यात हमखास जिंकतात. हेच टी10 च्या बाबतीत होईल, असंही अक्रमला वाटतं.