नवी दिल्ली : सोनीपत कँपमध्ये कुस्तीपटू नरसिंग यादवच्या जेवणात कथित औषध मिसळणाऱ्या आरोपीची ओळख पटल्याचा दावा, कुस्ती महासंघाने केला आहे.


 

ज्याने हे कटकारस्थान केलं, तो एका सीनियर आंतरराष्ट्रीय खेळाडूचा भाऊ आहे, सध्या तो छत्रसाल आखाड्यात सराव करतो, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांनी दिली. 'एनडीटीव्ही'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

 

साईच्या आचाऱ्यांनी ओळखलं


इतकंच नाही तर भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया - साई) आचाऱ्यांनीही आरोपीला ओळखल्याचं सांगण्यात येत आहे.

 

रिओ ऑलिम्पिकच्या तोंडावर भारतीय क्रीडा जगतात डोपिंगच्या डागामुळे खळबळ उडाली आहे. कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे, त्याची आलिम्पिकवारी हुकली आहे. मात्र नरसिंगने आपल्याशी घातपात झाल्याचा दावा केल्यामुळे, कुस्ती महासंघाने त्याची पाठराखण केली होती.

 

त्यातच आता कुस्तीमहासंघाने नरसिंगच्या जेवणात औषध मिसळणाऱ्या आरोपीचा शोध घेतल्याचा दावा केला आहे.

 

रिओ ऑलिम्पिकसाठी नरसिंगऐवजी प्रवीण राणाला संधी

कुस्ती महासंघाचा दावा


कुस्ती महासंघाच्या मते, आचाऱ्यांनी ओळखलेल्या आरोपीनेही, नरसिंगच्या जेवणात औषध मिळाल्याचं मान्य केलं आहे.

 

घातपाताचा पहिल्या दिवसापासून दावा


दरम्यान, कुस्तीपटू नरसिंग यादव पहिल्या दिवसापासूनच फसवणूक झाल्याचा आरोप करत आहे.

 

नाडा अर्थात नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने सोनिपतमधल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेत 5 जुलै रोजी चाचणी केली होती. या चाचणीमध्ये नरसिंग यादव ए, बी सॅम्पलमध्ये दोषी आढळला होता.तेव्हापासून भारतीय क्रीडा जगतात खळबळ उडाली होती.

 

निर्दोषत्त्व सिद्ध करण्याची नरसिंगची अखेरची संधी

पैलवान नरसिंग यादवला उत्तेजक प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्याची आज अखेरची संधी मिळेल. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे नाडाच्या कार्यालयात आज दुपारी चार वाजता नरसिंगची सुनावणी होणार आहे. ही सुनावणी नाडाच्या शिस्तपालन समितीसमोर होईल. या सुनावणीत नरसिंगला त्याच्या बाजूनं चौघांना साक्षीसाठी बोलावता येईल. तसंच या सुनावणीत वकील विदुष सिंघानिया हे त्याची बाजू मांडतील.

 

गोळाफेकपटू इंद्रजीत सिंहवरही डोपिंगचा डाग

नरसिंगला न्याय मिळवून देण्यासाठी क्रीडमंत्र्यांना पत्र : मुख्यमंत्री

पैलवान नरसिंग यादव न्याय मिळवून देण्यासाठी आपण केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांना पत्र लिहिलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळं त्याची ऑलिम्पिकवारी हुकण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची माहिती दिली.

 

कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी


योगेश्वर दत्तकडून नरसिंगची पाठराखण

दरम्यान, उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेला भारताचा पैलवान नरसिंग यादवची पाठराखण करणाऱ्या दिग्गजांमध्ये आता पैलवान योगेश्वर दत्तही सामील झाला आहे. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरनं कांस्यपदकाची कमाई केली होती. रिओ ऑलिम्पिक तोंडावर आलेलं असताना नरसिंग उत्तेजक चाचणीत दोषी आढळतो यावर विश्वास कसा बसायचा, असा सवाल करून योगेश्वरनं या प्रकरणाला कटकारस्थानाचा वास येत असल्याचा आरोप केला आहे. योगेश्वर दत्त आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, भारतीय कुस्तीवर ओढवलेल्या परिस्थितीमुळं मी आज दु:खी आहे. मी विश्वासानं सांगतो की, नरसिंग उत्तेजक घेऊ शकत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.

 

काय होता नरसिंग विरुद्ध सुशीलकुमार वाद?
रिओ ऑलिम्पिकच्या 74 किलो वजनी गटात महाराष्ट्राचा नरसिंग यादवच भारताचं प्रतिनिधित्व करेल, यावर दिल्ली उच्च न्यायालयानंही शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे कुस्तीपटू सुशील कुमार याचे रिओ ऑलिम्पिकसाठीचे स्वप्न भंगलं होतं.
गेल्या वर्षी लास वेगासमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत नरसिंग यादवनं कांस्य पदकाची कमाई करून रिओ ऑलिम्पिकसाठीचा कोटा मिळवला होता. त्यामुळं भारतीय कुस्ती फेडरेशननंही नरसिंगलाच रिओ ऑलिम्पिकला पाठवण्याचा निर्णय घेतला.
भारताचा डबल ऑलिम्पिक विजेता पैलवान सुशीलकुमारला हा निर्णय रुचला नाही. त्यानं आणि त्याच्या समर्थकांनी भारतीय कुस्ती फेडरेशनच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
रिओ ऑलिम्पिकच्या 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व कुणी करावं या निर्णयासाठी आपली आणि नरसिंगची चाचणी कुस्ती खेळण्याची मागणी केली होती. पण दिल्ली उच्च न्यायालयानं दहा दिवस सुरू असलेल्या सुनावणीनंतर सुशीलकुमारची मागणी फेटाळली.

संबंधित बातम्या

नरसिंगचा रुम पार्टनर संदीप तुलसीही उत्तेजक चाचणीत दोषी


नरसिंग कटाचा बळी, न्यायासाठी लढणारः WFI


रिओ ऑलिम्पिकसाठी नरसिंगऐवजी प्रवीण राणाला संधी


कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी