मुंबई : रिक्षाचालकासोबत दोन रुपयांसाठी झालेला वाद मुंबईतल्या 26 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. वादानंतर पळणाऱ्या रिक्षाचालकाला पकडण्याच्या नादात रिक्षा अंगावर उलटल्याने चेतन आचिर्णेकर या तरुणाचा मृत्यू झाला.


 
गोव्याहून पहिला विमान प्रवास करुन चेतन घरी परतत होता. त्याचवेळी विक्रोळीतील गोदरेज कॉलनीमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी रिक्षाचालक कमलेश प्रसाद याला अटक केली आहे.

 
शुक्रवारी चेतन रात्री सव्वा वाजण्याच्या गोव्याहून विमानाने मुंबई विमानतळावर उतरला. तिथून त्याने विक्रोळीतील गोदरेज कॉलनीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षाचं भाडं 172 रुपये झालं.

 

तेव्हा चेतनने पाचशे रुपयांची नोट दिली, पण रिक्षाचालकाने सुट्टे नसल्याचं सांगितल्यावर चेतन घरी गेला आणि 200 रुपये घेऊन आला.
मात्र सुट्ट्या दोन रुपयांवरुन दोघांमध्ये वादावादी झाला. तितक्यात चेतनचे वडील खाली आले आणि दोन रुपये नसतील तर आठ रुपये सोड असं चेतनला सांगितलं. वडिलांचं ऐकून चेतन वीस रुपये घेऊन घरी परतत होता, मात्र त्याचवेळी रिक्षाचालकाने त्याला उद्देशून शिवीगाळ केली.

 
हे ऐकून चेतनला राग अनावर झाला आणि तो मागे वळला, मात्र तोपर्यंत रिक्षाचालकाने रिक्षा सुरु केली होती. पळणाऱ्या रिक्षाचा पाठलाग करताना चेतनने रिक्षाचा दांडा पकडला आणि नेमकी त्याच वेळी रिक्षा त्याच्या अंगावर उलटली. रिक्षा अंगावर पडल्यामुळे चेतनच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. बीबीएतील ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर नुकतीच त्याला अकाऊण्टन्सी फर्ममध्ये नोकरी लागली होती.

 
विक्रोळी पोलिसांनी रिक्षाचालक कमलेश प्रसाद याला अटक केली आहे. त्याच्यावर कलम 304 (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे.