मुंबई : विश्वविजेत्या टीमचे गुरूवारी मुंबईत जल्लोषात स्वागत झालं. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या मार्गावर टीम इंडियाची विजयी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. अपेक्षापेक्षा जास्त नागरिक मिरवणुकीत सहभागी झाल्याने नागरिकांना आवरणंही पोलिसांसाठी जिकरीचं होतं. उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती असताना मुंबई पोलिसांनी 'सदरक्षणाय खलनिग्रणाय' या ब्रीद वाक्याप्रमाणे आपली भूमिका चोख बजावली. कालचा विजयोत्सव मुंबई पोलिसांनी कुठलेही गालबोट न लागता यशस्वी करून दाखवला. टिम इंडियाचे सर्वांनीच कौतुकं केलं, मात्र समोर उसळलेला जनसागर आणि त्यात पोलिसांची भूमिका पाहून विश्वविजेत्यांनी पोलिसांचेच आभार मानले
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर भारतीय संघाचे आगमन झाले. विमानतळाबाहेरच चाहत्यांनी गर्दी केली होती. भारतीय खेळाडूंची बस ही मरीन ड्राइव्हच्या दिशेने जात असताना रस्त्यांच्या दुतर्फा नागरिक भारतीय संघाचे अभिनंदन करण्यासाठी उभे होते. तर दुसरीकडे मरीन ड्राइव्ह येथे विजयी मिरवणुकीसाठीची गर्दी वाढतच होती. नियंत्रणाबाहेर गेलेली गर्दी संभाळण्यासाठी पोलिसांना वाढीव कुमक बोलवावी लागली. मरीनड्राइव्हचा परिसरात पाय ठेवायलाही जागा नसताना टिम इंडिया NCPA पर्यंत पोहचणार कशी असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी टिम इंडियाची बस मेट्रो सर्कलहून पुढे उच्च न्यायालयाच्या मार्गाने मंत्रालय वाल्मिकी चौकातून, उषा मेहता चौकातून NCPA पर्यंत पोहचवली. ऐनवेळी रूट बदलल्यामुळे क्रिकेटपट्टूंची सुरक्षाही तितकीच महत्वाची होती.
कसा होता बंदोबस्त?
भारतीय संघाची विजयी यात्रा यशस्वी करण्यासाठी 800 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेषत: जमलेली गर्दी लक्षात घेता बसच्या बाजूला 100 पोलिस जवानांचे वर्तुळ पोलिसांनी उभे केले होते. तसेच प्रत्येक चौकात 100 हून अधिक पोलिस, वाहतूक पोलिसही तैनात होते. या शिवाय राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय सुरक्षा बलाचे जवानही बंदोबस्तासाठी होते. प्रत्येक रस्त्याच्या एक्झिट पॉईंटला रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. जेणेकरून कुणाला त्रास झाला तर तात्काळ त्याला रुग्णालयात नेहण्यात येईल. याशिवाय वानखडे स्टेडिअमच्या आतही पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
क्रिकेटपटूंनी मानले मुंबई पोलिसांचे आभार
क्रिकेटप्रेमींसाठी वानखडे स्टेडिअममध्ये चाहत्यांना विनाशुल्क केले होते. त्यामुळे 30 हजार आसन व्यवस्था असलेल्या स्टेडिअमवर 7 हजार नागरिक जास्त होते. तर बाहेर लाख दीड लाखांचा जनसमुदाय होता. इतक्या मोठ्या संख्येनं गर्दी जमा झाल्यामुळे काही लोकांना श्वास कोंडल्याचा त्रास झाल्याचं आता समोर आलं आहे. तसेच, काहींची प्रकृतीही अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावं लागलं. त्यामुळे एकीकडे गर्दीमध्ये आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंच्या स्वागताचा उत्साह दिसत असताना दुसरीकडे गर्दीमुळे काही प्रश्नही निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र पोलिसांच्या काटेकोर नियोजनामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. याच विराट कोहलीसह अनेक क्रिकेटपटूंनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.
मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम
कालच्या गर्दीत 50 ते 60 जणांना श्वसनाचा त्रास झाला. 80च्या आसपास मोबाईल मिसिंगची तक्रार मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात नोंदवली. 10 ते 12 अल्पवयीन बेपत्ता मुलांना पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुखरुप पोहचवले. मरीनड्राइव्ह परिसरतून शेवटचा नागरिक सुखरुप बाहेर पडेपर्यंत पोलिस कर्तव्य दक्षपणे आपली भूमिका बजावत होते. एकूणच काय तर कालचा दिवस जरी टिम इंडियाच्या कौतुकाचा असल तरी मुंबई पोलिसांच्या कार्याला ही एक सलाम बनतोच...
हे ही वाचा :