T 20 World Cup 2021 : टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. या विश्वचषकाचं वैशिष्ट्य म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सहा विश्वचषकात यष्टिपाठी राहून धोनीनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. पण हाच धोनी आता टीम इंडियाचा मेन्टॉर बनून, डगआऊटमधून टीम इंडियाच्या रथाचं सारथ्य करणार आहे. एक यशस्वी फलंदाज, विकेटकिपर आणि कर्णधारानंतर आता मेन्टॉर असलेल्या 'मेन्टॉर'सिंह अर्थात महेंद्रसिंह धोनीच्या नव्या इनिंगकडे सर्वांचे लक्ष आहे.
2007 ते 2016 सलग सहा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक आणि 33 सामने... महेंद्रसिंग धोनी प्रत्येक ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताकडून यष्टीपाठी उभा होता. युएईत हाच धोनी यष्टीपाठी नसला तरी टीम इंडियाच्या शिलेदारांच्या पाठीशी तो उभा आहे.
यंदाच्या विश्वचषकात धोनी खेळताना दिसणार नाही हे वर्षभरापूर्वीच स्पष्ट झालं होतं. पण बीसीसीआयनं धोनीला टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून नियुक्त केलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. धोनीनही ही नवी जबाबदारी आनंदानं स्वीकारली. आणि तीही कोणताही मोबदला न घेता.
विश्वचषकाआधीच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं इंग्लंडवर आरामात विजय मिळवला. पण या सामन्यादरम्यान सर्वात जास्त फुटेज कुणी खाल्लं असेल तर ते एमएस धोनीनं. कारण टेलिव्हिजनचा कॅमेरा निळ्या जर्सीतल्या धोनीवरच स्थिरावला होता...
धोनीच्या ड्रेसिंगरुममधल्या वावरानं खेळाडूंमध्येही उत्साह असल्याचं सलामीवीर लोकेश राहुलनं म्हटलंय. रिषभ पंत आणि ईशान किशन हे दोघंही धोनीकडून यष्टिरक्षणाचे धडे घेतायत. विराट कोहलीसह भारतीय संघातला प्रत्येक शिलेदार आज धोनीकडून कानमंत्र घेतोय. कर्णधार म्हणून धोनीनं त्याच्या कारकीर्दीत एक ना अनेक पराक्रम आपल्या नावावर केले आहेत.
2007 सालचा पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक असो.. कसोटी क्रिकेटमधलं अव्वल स्थान असो.. किंवा २०११ सालचा आयसीसी वन डे विश्वचषक असो.. त्याशिवाय आशिया चषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएलची चार विजेतीपदंही धोनीच्या खजिन्यात जमा आहेत..
एक क्रिकेटर म्हणून महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. पण निवृत्तीनंतरही टीम इंडियासाठीची त्याची इनिंग ही खास आहे. टीम इंडियाचा मेन्टॉरसिंग धोनी बनून तो ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या रणांगणात उतरलाय. विश्वचषकाच्या या महायुद्धात धोनी क्रिकेटच्या खेळातलं कोणतंही शस्त्र हाती धरणार नाही. पण टीम इंडियाच्या रथाचं सारथ्य हे त्याच्याच हाती असणार आहे. तेही डगआऊटमध्ये बसून...