T20 World Cup 2021, IND vs PAK: ICC T20 विश्वचषक 2021 चे (ICC T20 World Cup 2021) सुपर 12 सामने सुरु झाले आहेत. भारतीय संघ रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात करेल. जगभरातील बहुतेक क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणाऱ्या सामन्याची वाट पाहत आहेत. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर प्रथमच दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. टीम इंडियाने आपले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत.


भारतीय फलंदाज आणि गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा आठ गडी राखून पराभव झाला. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा उत्साह उंचावला आहे.


ही टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन असू शकते
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.


संजय मांजरेकर यांचं हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य 
संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबाबत चर्चा रंगत आहेत. त्याने सराव सामन्यांमध्ये गोलंदाजी केली नाही, यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावर आहेत. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही हार्दिकबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, "हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीची तंदुरुस्ती ही भारताच्या प्लेइंग इलेव्हनच्या समतोलची गुरुकिल्ली आहे. कदाचित त्यामुळेच विराटने सराव सामन्यात काही षटके टाकली असतील. कारण, गरज लागू शकते.."


पाकिस्तानकडून 12 सदस्यीय संघाची घोषणा 
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शनिवारी आयसीसी टी -20 विश्वचषकातील भारताविरुद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली. पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर शोएब मलिकला बऱ्याच काळानंतर संघात स्थान देण्यात आले आहे. बाबर आझम व्यतिरिक्त, मोहम्मद रिझवान, फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ यांचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे.