मुंबई :  मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रूमला लोकांना मदत व्हावी यासाठी कार्यरत करण्यात आलं आहे. मात्र याच कंट्रोल रुममध्ये असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रशेखर धुरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी उद्धट बोलत त्यांना धमकावत शिवीगाळ करण्याचं काम या अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून वारंवार केलं जात होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आरोपी दरवेळी वेगवेगळ्या भाषेच्या टोनमध्ये शिवीगाळ करायचा.


यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटकडून या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला. 16 ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये लागोपाठ सहा ते सात वेळा कॉल आले. त्या प्रत्येक कॉलमध्ये वेगवेगळ्या भाषेच्या टोनमध्ये बोलण्यात आलं आणि ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्याशी उद्धटपणे बोलून, त्यांना धमकावून त्यांना शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास क्राईम इंटेलिजन्स युनिट कडून सुरू करण्यात आला.


पोलिसांनी आलेले कॉल वारंवार ऐकले आणि प्रत्येक कॉलमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या टोनचा वापर केला गेला होता. या कॉलमध्ये मराठी,बंगाली,उर्दू आणि दाक्षिणात्य भाषांचा टोनचा वापर करण्यात आला होता.


ज्या नंबर वरून फोन आले होते, त्या नंबरला ट्रेस करण्याचं काम पोलीसांनी सुरू केलं,त्यानंतर हे सर्व फोन मुंबईच्या खारदांडा मधून आल्याचा पोलीसांच्या तपासात समोर आलं, त्यानंतर पोलीसांनी खारदांडा मधूनच चंद्रशेखर धुरी (41) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ज्याने हे सर्व कॉल केले होते. चंद्रशेखर वर याआधी सुद्धा दोन गुन्हे दाखल आहेत त्यासाठी त्याला पाच वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. चंद्रशेखर धुरी पाच वर्ष तळोजा जेलमध्ये होता, तिथे तो या वेगवेगळ्या भाषांचा टोन शिकला. 


या वेगवेगळ्या भाषांच्या टोनचा वापर करत चंद्रशेखर धुरी कर्तव्यावर उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांच्याशी उद्धटपणे बोलून त्यांना शिवीगाळ केली. इतकंच नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. चंद्रशेखर धुरीला पोलीसांनी अटक केली असून त्याने हे सगळं का केलं? या कारणाचा सुद्धा शोध आता पोलीसांकडून घेतला जातोय.