पठाणकोट: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतला आहे. कारण त्याच्या काकांची हत्या झाली असल्याची माहिती आहे. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या 58 वर्षीय काकांची हत्या झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना पंजाबच्या पठाणकोटमधील थारियाल गावात घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. तर या हल्ल्यात सुरेश रैनाचे काका अशोक कुमार यांचा मृत्यू झाला आहे.


याबाबत अशोक कुमार यांचे ज्येष्ठ बंधू श्याम लाल यांनी ते रैनाचे काका असल्याची पुष्टी केली आहे. सुरेश रैना लवकरच याठिकाणी भेट देण्यास येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कुख्यात ‘काळे कच्छेवाला’ टोळीतील तीन ते चार जण घर लुटण्याच्या हेतूने आले होते. पठाणकोटच्या माधोपूरजवळील थारियाल गावात ते अशोक कुमार यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला.


IPL 2020 | सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नाही, वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला!


पठाणकोटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुलनीतसिंग खुराणा यांनी सांगितलं की, हल्ल्याच्या वेळी सर्व जण आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी दिली. या हल्ल्यात त्यांची आई सत्या देवी, त्यांची पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कुशल हे जखमी झाल्याची माहिती आहे.


सुरेश रैना भारतात परतला 


चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू असलेला सुरेश रैना संयुक्त अरब अमिरातमधून भारतात परतला आहे. वैयक्तिक कारणाने तो मायदेशी परत आला असल्याची माहिती देण्यात आली होती. चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. वैयक्तिक कारणांमुळे सुरेश रैना भारतात परतला आहे. आयपीएलच्या या मोसमात तो खेळू शकणार नाही. चेन्नई सुपर किंग्ज अशा काळात सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे," असं ट्वीट चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं.