मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैना यंदाच्या आयपीएलला मुकणार आहे. सुरेश रैना संयुक्त अरब अमिरातमधून भारतात परतला आहे. वैयक्तिक कारणाने तो मायदेशी परत आला आहे. चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.


"वैयक्तिक कारणांमुळे सुरेश रैना भारतात परतला आहे. आयपीएलच्या या मोसमात तो खेळू शकणार नाही. चेन्नई सुपर किंग्ज अशा काळात सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे," असं ट्वीट चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं.





IPL 2020 | चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पॉझिटिव्ह


33 वर्षीय सुरेश रैनाने 15 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. यानंतर आयपीएलच्या सराव शिबिरातही सुरेश रैना सामील झाला होता. संघासोबत तो दुबईला रवाना होता, तिथे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मुक्काम 'ताज' हॉटेलमध्ये आहे.


चेन्नई सुपर किंग्जसाठी हा मोठा धक्का समजला जोता. एक दिवसआधीच वृत्त समोर आलं होतं की, संघाच्या स्टाफमधील अनेक जणांना कोरोनाची लागण झाली होती. तसंच एक गोलंदाजही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. हा गोलंदाज दीपक चहर असल्याचं म्हटलं जात आहे.


आयपीएलच्या तेरावा मोसमाची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने चेन्नईचा संघाच्या खेळाडूंचा क्वारन्टाईन कालावधी एक आठवड्याने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे संघ 1 सप्टेंबरपासून सरावाला सुरुवात करु शकणार नाही.