भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका भंडारा जिल्ह्याला बसला आहे. पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आले पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा शहरात नागपूर नाक्यावर 3 फुट पाणी जमा झालं आहे. यामुळं भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या संपर्क तुटला आहे. 26 हजार क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरु असल्याने गोसेखुर्द धरणाचे बॅक वॉटर भंडारा शहरातील नागपूर नाका (साई नाथ नगर )परिसरात घुसले असून भोजापूर नाल्यावरुन चार फुट पानी वाहत असल्याने भंडारा-नागपूर मार्ग बंद आहे.
रांझीच्या गणेश मंदिरात 25 वर्षानंतर पाणी
नदी काठावर असलेल्या रांझीच्या गणेश मंदिरात तब्ब्ल 25 वर्षांनंतर दोन फूट पाणी आत शिरले आहे. गणपतीच्या पायाला या पाण्याचा स्पर्श झाला आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या टोकावरुन वाहत असलेल्या वैनगंगा नदीला पूर आल्याने काल रात्रीपासून दोन्ही राज्याचा संपर्क भंडारा जिल्ह्याचा तुटला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे बावणथडी धरण 100 टक्के भरलं आहे. या धरणाची 4 दारे उघडण्यात आली आहे.
वैनगंगा, बावनथडी नदीला पूर
मागील तीन दिवसापासून भंडारा -गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशात पावसाची संततधार सुरूच असून कधी मुसळधार तर कधी रिमझिम स्वरूपाचा पाऊस येत असल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. दुसरीकडे मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाचे दारे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून बावनथडी नदीला देखील पूर आला आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे चार मीटरच्या वर उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पोल्ट्री फार्ममध्ये पाणी, 3500 कोंबड्यांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात तीन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीलाही पाण्याने वेढा दिला आहे. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द गावातील गोविंद बोन्द्रे या शेतकऱ्यांने आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतावरच पोल्ट्री फार्म उभारणी केली होती. मात्र या पावसामुळे वैनगंगा नदीचे पाणी पोल्ट्री फार्ममध्ये चार फूट पाणी शिरल्याने 3500 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून पाण्यावर तरंगतांना दिसत आहेत. तर जवळपास 3 लाख 50 हजाराच्या जवळपास आर्थिक नुकसान झाल्याने शासनांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.