मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा फॉरमॅट जुनाच असला, तरी नव्याने करण्यात आलेली संघबांधणी हे या मोसमाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यासाठी प्रत्येक फ्रँचाईझीला त्यांच्या पसंतीच्या केवळ तीन-चार शिलेदारांना संघात कायम राखण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर आठही फ्रँचाईझींनी बाकीचा संघ हा लिलावातून उभारला. त्या लिलावात कोटीच्या कोटी उड्डाणं करून बोली लावण्यात आल्या. पण एवढी मोठी रक्कम मोजूनही कुणी सुपरफ्लॉप, तर कुणी पैसा वसूल कामगिरी बजावली.
आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा रथ मोठ्या झोकात उत्तरार्धाच्या दिशेने निघालाय. आयपीएलच्या या रणांगणात प्ले ऑफचं तिकीट कोणत्या चार फौजांना मिळणार याची कल्पना येत्या आठवड्याभरात येईल. पण या आठही फौजांनी कोटीच्या कोटी उड्डाणं करुन ज्या शिलेदारांना राखलं किंवा ज्या शिलेदारांना लिलावात विकत घेतलं त्यापैकी कोण टॉप आणि फ्लॉप झालंय, हा क्रिकेट चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरलाय.
कोटीच्या कोटी बोली लागलेले शिलेदार
आयपीएलच्या लिलावात यंदा राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्सवर सर्वाधिक साडेबारा कोटींची बोली लावली. स्टोक्सचा अष्टपैलू या नात्याने आजवरचा लौकिक लक्षात घेता, त्याच्यावर सर्वाधिक रकमेची बोली लागणं स्वाभाविक होतं. पण त्याच स्टोक्सने त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी काही बजावली नाही. राजस्थानच्या पहिल्या 10 सामन्यांमध्ये मिळून स्टोक्सच्या खात्यात केवळ 174 धावा आणि तीन विकेट्स अशी कामगिरी आहे. त्यामुळे स्टोक्स यंदाच्या मोसमातला सुपरफ्लॉप शिलेदार ठरला आहे.
राजस्थान रॉयल्सचाच डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा यंदाच्या लिलावातला सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. राजस्थानने त्याच्यावर साडेअकरा कोटींची बोली लावली. पण उनाडकटला आतापर्यंत 10 सामन्यांत केवळ आठच फलंदाजांना माघारी धाडण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे उनाडकटही यंदाच्या मोसमातला दुसरा सुपरफ्लॉप शिलेदार ठरलाय.
राजस्थानने युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला यंदाच्या लिलावात आठ कोटींची बोली लावली होती. संजू सॅमसनने आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह 332 धावा फटकावल्या आहेत. त्याही 141.27 च्या स्ट्राईक रेटने. त्यामुळे संजू सॅमसन राजस्थानचा पैसा वसूल शिलेदार ठरलाय.
मनीष पांडेची समाधानकारक कामगिरी
सनरायझर्स हैदराबादने धडाकेबाज फलंदाज मनीष पांडेवर अकरा कोटींची बोली लावली. यंदाच्या लिलावात ती तिसऱ्या क्रमांकाची बोली ठरली. त्याच मनीष पांडेने यंदाच्या मोसमात फार ग्रेट नाही, पण समाधानकारक कामगिरी बजावली. त्याने 10 सामन्यांत 112.19 च्या स्ट्राईक रेटने 184 धावा फटकावल्या आहेत. मनीष पांडे फलंदाजीला पाचव्या-सहाव्या क्रमांकावर उतरत असल्याने त्याची कामगिरी सुपरटॉप नसली तरी सुपरफ्लॉपही म्हणता येणार नाही.
पैसा वसूल शिलेदार
मूळच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या लोकेश राहुलला यंदा किंग्स इलेव्हन पंजाबने अकरा कोटी मोजून विकत घेतलं. पंजाबचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. कारण सलामीवीर या नात्याने राहुलने चार अर्धशतकांसह 471 धावांचा रतीब घातला आहे. त्यात यष्टीरक्षक म्हणूनही राहुल दुहेरी जबाबदारी सांभाळतोय. त्यामुळे पंजाबचा पैसा वसूल शिलेदार म्हणून राहुलचा उल्लेख करता येऊ शकतो.
कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर ख्रिस लिनने यंदाच्या मोसमात संमिश्र कामगिरी बजावली आहे. कोलकात्याने त्याच्यासाठी नऊ कोटी 60 लाख रुपये मोजले. त्याच लिनने यंदाच्या मोसमातल्या 11 सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह 298 धावा केल्या आहेत. त्यामुळं ख्रिस लिनला यंदाच्या मोसमातला सुपरटॉप किंवा सुपरफ्लॉप शिलेदार म्हणता येणार नाही.
आयपीएलचा दहावा मोसम गाजवणारा अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशिद खानला सनरायझर्स हैदराबादने नऊ कोटींची बोली लावून विकत घेतलं. रशिदने गतवर्षीचा फॉर्म कायम राखताना 10 सामन्यांत 13 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. यंदाच्या मोसमात तो पर्पल कॅपच्या शर्यतीतही दाखल झाला आहे. त्यामुळे रशिद खान हैदराबादचा पैसा वसूल शिलेदार ठरलाय.
मुंबई इंडियन्सने अष्टपैलू कृणाल पंड्याला 8 कोटी 80 लाखांची बोली लावून पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं. पंड्याने 11 सामन्यांत 189 धावा आणि 11 विकेट्स अशी दुहेरी कामगिरी बजावून आपलं अष्टपैलूत्व सिद्ध केलं. त्यामुळे कृणाल पंड्या मुंबई इंडियन्सचा पैसा वसूल शिलेदार ठरलाय.
मॅक्सवेलकडून साफ निराशा
दिल्ली डेअरडेव्हिल्सने नव्याने संघबांधणी करताना ग्लेन मॅक्सवेलवर मोठ्या अपेक्षेने नऊ कोटी रुपयांची बोली लावली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या या डेअरडेव्हिल फलंदाजाने दिल्लीची मात्र सपशेल निराशा केली. मॅक्सवेलला पहिल्या नऊ सामन्यांमध्ये केवळ 133 धावाच जमवता आल्या आहेत. त्यामुळे मॅक्सवेल दिल्लीचा सुपरफ्लॉप शिलेदार ठरलाय.
आयपीएलच्या महायुद्धातल्या काही लढाया अजूनही शिल्लक आहेत. त्या लढायांमध्ये नव्या जोमाने खेळून आपापल्या फौजेला प्ले ऑफचं तिकीट मिळवून देण्याचा प्रमुख शिलेदारांचा प्रयत्न राहील.