चंद्रपूर : विमानात, जहाजात, पाण्याच्या खाली, पॅराग्लायडिंग करताना लग्न झाल्याचे अनेक किस्से आतापर्यंत आपण ऐकले आणि पाहिले असतील. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात चक्क रुग्णवाहिकेत विवाह सोहळा पार पडला. हा विवाह हौस म्हणून नव्हे, तर सामाजिक जाणिवेतून पार पडला हे विशेष.


बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिंतलधाबा येथे गणेश आत्राम आणि वैशाली सोयाम यांचं लग्न होतं. मात्र लग्नाच्या धावपळीने अचानक एक दिवस आधी वैशालीची तब्येत बिघडली. तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे आता लग्न होणार की नाही, असा प्रश्न सगळ्यांना पडला.

मुलीकडील मंडळींनी तर लग्न सोहळा रद्द करण्याची तयारी दाखवली. मात्र अशा कठीण प्रसंगी मुलाचे वडील पुढे आले आणि त्यांनी मुलीकडच्या मंडळींना धीर दिला. या कठीण प्रसंगात देखील आपण साधेपणाने लग्न करु, असा सल्ला देत त्यांनी मुलीच्या वडिलांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं.

मुलीकडच्यांनी आणि मुलाकडच्यांनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने लग्न लावण्याचा निर्णय घेतला. नवरीला रुग्णालयातून चक्क रुग्णवाहिकेतून लग्नमंडपात आणण्यात आलं आणि वऱ्हाड्यांच्या साक्षीने लग्न लावण्यात आलं.

क्षुल्लक कारणांवरुन लग्न मोडल्याचे प्रकार आपण नेहमी पाहतो. मात्र कठीण प्रसंगातही एकमेकांना धीर देऊन दोन जीवांना आणि दोन कुटुंबांना एकत्र आणणाऱ्या या लग्नसोहळ्याचं कौतुक केलं जात आहे.